आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेततळ्यासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात बुडून चुलत भावांचा मृत्यू, एक जण बचावला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोड / पैठण - शेततळ्यासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात  पोहण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी दोन सख्ख्या चुलत भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर तिसऱ्याला गावकऱ्यांनी  तलावातून सुखरूप  बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचू शकला. सदरची घटना पैठण तालुक्यातील थेरगाव येथे बुधवारी (ता.१३) दुपारी बारा वाजता घडली. सोमनाथ बप्पासाहेबा गोलांडे  (वय १६) सोपान रमेश गोलांडे (वय १५)  अशी मृत चुलत भावंडांची नावे आहेत. तर बाळू सिद्धेश्वर वाघ  (वय १६) असे मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेल्या मुलाचे नाव आहे.

दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या चौघा मित्रांनी थेरगाव या गावालगतच्या तलावात पोहण्याचा बेत आखला होता. शाळेत जात असल्याचे सांगून चौघे जण बुधवारी शेत तळ्यासाठी खोदलेल्या खड्ड्याकडे गेले. परतीच्या जोरदार पावसामुळे या खड्ड्यात चांगलाच पाणी साठा झाला आहे. सोमनाथ गोलांडे, सोपान गोलांडे व गणेश वाघ हे तिघे जण तलावात पोहण्यासाठी उतरले. तर त्यांचा अन्य एक मित्र तलावा बाहेरच थांबला होता. पाण्यात उतरल्यावर त्यांच्यापैकी एकजण पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचवायला अन्य दोन मुले गेली. पण त्यांच्यापैकी कोणालाही पोहायला येत नसल्यामुळे तिन्ही मुले पाण्यात बुडू लागली. तिघे जण पाण्यात बुडायला लागल्यावर बाजूला बसलेल्या त्यांच्या मित्राची भीतीने गाळण उडाली. त्याने  घाबरून गावात पळत जाऊन तिघे जण बुडाले असल्याची घटना गावकऱ्यांना सांगितली. लगेच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुधीर पोहरेगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.रोहित जैन, डॉ.साकिब सौदागर,, डॉ. शिवाजी भोजने आदींनी  सोमनाथ गोलांडे, सोपान गोलांडे या चुलत भावंडांना तपासून मृत घेित केले तर गणेश वाघला वाचवण्यात डाॅक्टरांना 
यश आले. पाचोड पोलिस ठाण्याचे जमादार जगन्नाथ उबाळे व हनुमान धनवे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
 

रुग्णालयात नातलगांची गर्दी
दरम्यान मुले पाण्यात बुडाल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच कुटुंबातील व्यक्तीसह नातलग व गावकऱ्यांनी  घटनास्थळी धाव घेतली. तसेच ग्रामीण रुग्णालयातही मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मृत्युमुखी पडलेल्या भावंडांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. या घटनेची पाचाेड पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नाेंद करण्यात आली आहे.
 

एकुलता मुलगा
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून या घटनेतील मृत सोपान हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. सोमनाथ यास एक भाऊ आहे. आतापावेतो या वर्षभरात शेततळ्यात बुडून थेरगावात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुलांच्या पालकांनी पोहण्यासाठी जात असलेल्या मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...