आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थलांतरासाेबतच मराठवाड्यात वाढले बालविवाह; हेल्थ मॅनेजमेंट संस्थेच्या सर्व्हेचा निष्कर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यातील शेकडाे गरीब कुटुंबे पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरीत हाेत असून त्यात ऊसताेडणी कामगारांचे प्रमाण माेठे आहे. दर तीन वर्षांनी या भागाला दुष्काळाचे चटके बसत असल्यामुळे २० ते २५ टक्के लाेकांचे स्थलांतर हाेत आहे. यादरम्यान गरिबी, अज्ञान, मुलगी सांभाळण्याची जाेखीम, लैंगिक अत्याचाराची भीती, जबाबदारीचे आेझे या कारणांमुळे या स्थलांतरित कुटुंबात बालविवाहांचे प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे.

 

पाचाेड येथील इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मॅनेजमेंट संस्थेने केलेल्या पाहणीत हे वास्तव समाेर आले. एकट्या जालना जिल्ह्यात बालविवाहांचे प्रमाण २०१५ मध्ये ५३ टक्के हाेते. मात्र, गेल्या वर्षी ते ४८ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे मात्र मराठवाड्यात बालविवाहांचे प्रमाण अजूनही ४५ टक्के असल्याचे सांगताे.

 

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात व शहरी वस्तीत सुमारे ५० टक्के किशाेरवयीन मुलींचे लग्न १८ वर्षांच्या आत हाेत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डाॅ. अशाेक दयालचंद यांनी दिली. ही संस्था १९९८ पासून किशाेरवयीन मुलींच्या प्रश्नांवर काम करत आहे. किशाेरवयीन मुलींचे विवाह राेखणे, ज्या अल्पवयीन मुलींचे विवाह झाले आहेत त्यांची प्रसूती किमान १९ वर्षांनंतर होण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विवाहित किशाेरवयीन मुलींना प्रजनन आराेग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे  विवाहित किशाेरवयीन मुली आणि नवजात बाळांमध्ये आजार, मृत्यूच्या प्रमाणामध्ये माेठी घट असल्याचा संस्थेचा दावा आहे. जालना, नांदेड, आैरंगाबाद, धुळे, जळगाव, बीड, बुलडाणा या जिल्ह्यांत संस्थेचे काम चालते.

 

बालविवाहाचा परिणाम माता-बाल मृत्युदरावर
बालविवाहांमुळे किशाेरवयीन मुलींच्या प्रसूतीदरम्यान पहिल्या २८ दिवसांत बाल मृत्युदराचे प्रमाण माेठे असते. तसेच आजारपण व अयाेग्य देखभालीमुळे माता मृत्युदरही लक्षणीय आहे. त्यामुळे इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मॅनेजमेंटच्या माध्यमातून किशाेरवयीन मुलींचे आजारपण कमी करणे, गर्भनिराेधक गाेळ्यांबाबत जागृती करणे, शिक्षणाचे प्रमाण वाढवणे यावर भर दिला जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...