आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दम ना तोडे कहीं भूख से बचपना...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील गरिबीचा प्रश्न मोठा आहे, परंतु त्याची उत्तरे सोपी आहेत, हा सिद्धांत मांडणाऱ्या अभिजित बँनर्जी या भारतीय अर्थशास्त्रज्ञाचा नोबेल पुरस्काराने गौरव होणे आणि त्याच भारताचा ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ घसरणे हा विरोधाभास भारतीयांचा करंटेपणाचा ताजा पुरावा आहे. पंतप्रधानांच्या परदेश वाऱ्यांचे लाईव्ह कव्हरेज असो वा अमेरिका-जपानच्या राष्ट्रप्रमुखांसोबतचे इव्हेंट्स असोत; जगाच्या पाठीवर भारताची प्रतिमा उंचावल्याच्या आभासात भरपेटे मश्गुल असताना देशातील बालकांचे अर्धपोटी असणे देशाच्या विकास दराबद्दल चिंता व्यक्त करणारे ठरले आहे. आर्यलंडच्या वर्ल्डवाईड आणि जर्मनीच्या वेल्ट हंगर हिल्फ या दोन आंतरराष्ट्रीय संस्थांनी जगातील ११७ देशांचा अभ्यास करून जाहीर केलेल्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत १०२ क्रमांकावर घसरल्याचा गंभीर निष्कर्ष पुढे आला आहे. बालकांचे कुपोषण, वजन-उंची आणि वय यांतील समतोल निकष आणि बालमृत्यू यांचा अभ्यास करून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या या ग्लोबल इंडेक्समध्ये देदीप्यमान भारताचा भुकेला चेहरा जगापुढे आला आहे. विशेष म्हणजे, अमेरिका किंवा जपान यांच्या प्रमुखांसोबत फोटो सेशन न करणाऱ्या, विकासदराचा आकडा आणि आवाका यांत भारताच्या तुलनेत क्षुल्लक असलेल्या नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान यांची त्यांच्या देशातील भूक निर्मूलनातील कामगिरी भारतापेक्षा उजवी ठरली आहे. हद्द म्हणजे, सतत युद्धाच्या छायेत गांजलेला येमेन असो वा नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडणारा दिबेटी; या देशांचीही कुपोषण निर्मूलनाची कामगिरी समाधानकारक असताना भारतात भुकेचा प्रश्न चिंताजनक ठरला आहे. या पार्श्वभूमीवर, कदाचित लवकरच या संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ शकतो किंवा भारताची प्रतिमा मलीन करण्याची कूटनिती रचल्याच्या आरोप करून सदर अहवाल बासनातही गुंडाळून ठेवला जाऊ शकतो. परंतु, सरकारी आकडेवारीवरच बेतलेल्या या अहवालातील भुकेच्या वास्तवाचा आगडोंब सहजासहजी शांत होणार नाही, याची जाणीव सत्ताधाऱ्यांनाही झालेली असते. अर्थात, भाकरीचा प्रश्न ना भक्तीच्या डोसाने सुटतो ना अस्मितेच्या गोळीने. यासाठी ‘भुके’चा प्रश्न आधी मान्य करावा लागतो. त्याची सोडवणूक हा पुढला भाग. कदाचित, भारतापुढचे आव्हान यासाठीच कठीण आहे. भारताने या पाच वर्षात बालमृत्यूंच्या समस्येवर मात केल्याचा निष्कर्ष, हाच यातील एक आशेचा किरण. अर्थात झोपलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही. महासत्ता होण्याच्या नादात गालिचाखाली झाकलेल्या महाभुकेने भारताची लक्तरे जगाच्या वेशीवर  टांगली जाणे ना भरपेट्यांसाठी गर्वाचे आहे ना अर्धपोटी झोपणाऱ्यांसाठी सुरक्षित. देशातील सर्वात प्रगत राज्याच्या निवडणुकीत सत्तेतील एका पक्षाने एक हजार अब्ज डॉलरपर्यंत अर्थव्यवस्थेचा ‘संकल्प’ करणे आणि त्यांच्या मित्रपक्षाने दहा रुपयात थाळीचे ‘वचन’ देणे ही आर्थिक विकास आणि मानवी विकास याबाबतच्या आपल्या धोरणकर्त्यांच्या दृष्टिकोनातील तफावत सिद्ध करते.  

बातम्या आणखी आहेत...