आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना शिकवावे लागेल, की उजेड निर्माण करता येतो; सूर्यप्रकाश नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आनंद पांडेय 

आजची मुले मार्क मिळवण्याच्या लढाईत आयुष्यात येणाऱ्या वादळांशी झुंज देण्यास विसरत आहेत का? संसदेत नुकत्याच सादर झालेल्या आकड्यांमधून तर हेच निदर्शनास येते. पहिला आकडा आयआयटी, आयआयएममध्ये शिकणाऱ्या मुलांच्या आत्महत्यांचा आहे. दुसरा आकडा आयआयटी, ट्रिपल आयटीचे शिक्षण अर्ध्यातच सोडणाऱ्या मुलांचा आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील सर्वांत प्रतिष्ठित संस्था मानल्या जाणाऱ्या आयआयटी, आयआयएमच्या साठ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजे दर महिन्याला एका प्रतिभासंपन्न तरुणाचा मृत्यू झाला. आता देशभरातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची एकूण आकडेवारी पाहू. २०१४ ते १६ या तीन वर्षांत देशभरात (सर्व शाळा- महाविद्यालये मिळून) जवळपास २६ हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. म्हणजे साधारण दर तासाला एक अकाली मृत्यू झाला. तिकडे गेल्या पाच वर्षांतच सात हजार मुलांनी आयआयटी आणि ट्रिपल आयटीचे शिक्षण अर्ध्यातच सोडले.

वास्तविक मुलांच्या आत्महत्यांना ते स्वत: नाही, तर मोठे जबाबदार आहेत. मोठ्यांनी मुलांच्या सुपीक डोक्याला केवळ मार्क उगवणारे एक यंत्र मानले आहे. जितके चांगले मार्क, तितकी मशिन चांगली. आयुष्यात काहीही मिळवायचे असेल, तर प्रगतिपुस्तकच त्याचा आधार आहे, हेच मुलांच्या मनावर बिंबवले जाते. मुलांनाही माहीत आहे, की प्रतिभा वारशाने मिळत नाही. मग ते जीव तोडून रक्ताचे पाणी करणारी मेहनत करतात. शंभरपैकी शंभर मार्क मिळवतात. पण, वाटेतच लढता लढता थकतात आणि पळवाट शोधतात. बहुतांश वेळा हेच दिसून येते की स्वप्नं आई-वडिलांची असतात, मुले मात्र त्यात नाईलाजाने रंग भरतात. इथूनच असह्य तणाव सुरू होतो, ज्याची परिणीती आत्महत्येच्या रुपात समोर येते. गरज असते ती प्रत्येकातील प्रतिभा ओळखण्याची. मुलांना हे सांगावे लागेल, की आई-वडिलांच्या किंवा टोकाच्या दबावाखाली येऊन कृत्रिमपणे, काहीतरी वेगळे करण्यापेक्षा ते निसर्गत: जसे आहेत, त्यावरच त्यांनी फोकस केला पाहिजे. या भयावह संकटातून वाचण्यासाठी आपल्याला कुटुंबांमध्ये आपुलकीचा, ममत्वाचा अनोखा संवादही सुरू करावा लागेल.

आम्हाला स्वत:ला विचारावे लागेल, की आपण मुलांशी मार्कांशिवाय असा शेवटचा संवाद कधी केला आहे? आपली प्रतिभा आणि आई-वडिलांच्या जिद्दीचा काढा पिऊन अत्यंत प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवणारी मुले मध्यातच शिक्षण सोडत आहेत. त्यांना वाटत असावे की परीक्षेतील प्रश्नपत्रिकेप्रमाणे आयुष्यातील प्रश्नपत्रिकाही एकसारख्या असतील. त्यांना हे समजावून सांगावे लागेल, की आयुष्यातील परीक्षेसाठी भलेही अभ्यासक्रम सारखाच असला, तरी सगळ्यांची प्रश्नपत्रिका वेगवेगळी असते. त्यामुळे 'कॉपी'चा काहीही उपयोग होत नाही. त्याचवेळी मुलांना हेही शिकवावे लागेल, की ज्याप्रमाणे उजेड निर्माण केला जाऊ शकतो, पण सूर्यप्रकाश नाही, तसे शिक्षणाने मार्क तर मिळवता येतात, पण आयुष्याशी दोन हात करण्याची क्षमता मिळत नाही.

आनंद पांडेय, नॅशनल हेड, सिटी भास्कर-डीबी स्टार