• Home
  • Business
  • Auto
  • Children up to 18 years can drive 50cc vehicles; But in the country, such vehicles production have been closed

Auto / १८ वर्षांपर्यंतची मुले ५० सीसीची वाहने चालवू शकतात; पण देशात अशा वाहनांची निर्मितीच झाली आहे बंद

जशी मागणी, तशीच वाहनांची निर्मिती : सियाम, वाहन नाही तर लायसन्स कसे?
 

प्रसाद कानडे

Aug 18,2019 10:05:00 AM IST

सोलापूर/मुंबई - देशात दुचाकी वाहनांचे लायसन्स दोन स्तरावर दिले जाते. पहिला-१६ ते १८ वर्षांपर्यंतसाठी. दुसरा- १८ पेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी. १६ ते १८ वयोगटातील किशोरांना ‘विदाउट गिअर’ दुचाकी चालवण्याची परवानगी दिली जाते. त्यातही अट अशी आहे की, वाहन ५० सीसीपेक्षा कमी असायला हवे. आश्चर्याची बाब म्हणजे देशात नऊ वर्षांपूर्वी म्हणजे २०१० मध्येच ५० सीसीची वाहने तयार होणे बंद झाले आहे. कुठलीही वाहन निर्माती कंपनी ५० सीसीचे वाहन तयार करत नाही. त्यामुळे १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे किशोर ५० सीसीच्या वाहनांचे लायसन्स घेऊन १०० सीसीपर्यंतचे वाहन चालवत आहेत.


टीव्हीएस कमीत कमी ९९.७ सीसी इंजिनाचेच वाहन तयार करत आहे. हिरो मोटोकाॅर्क आणि बजाजी एवढ्या कमी सीसीचे वाहन तयार करत नाहीत. देशात ५० सीसीच्या आत अखेरचे दुचाकी वाहन कायनेटिक लुना टीएफआरच होते. ३५ सीसीची ही लुना १९७२ मध्ये लाँच झाली आणि २००० पर्यंत मार्केटमध्ये राहिली. त्यानंतर ६० सीसीची लुना सुपर आली. सोलापूरचे एआरटीओ संजय डोळे म्हणाले की, ५० सीसीची वाहनेच तयार होत नाहीत. त्यामुळे नियम बदलायला हवेत.

जशी मागणी, तशीच वाहनांची निर्मिती : सियाम

सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सचे (सियाम) महासंचालक विष्णू माथूर म्हणाले की, बाजारात जशी मागणी होते, वाहन त्याच हिशेबाने तयार होतात. जर एखाद्या गोष्टीची मागणीच नसेल तर ती तयार कशी होईल? जर ५० सीसीच्या वाहनांची निर्मिती होत नाही तर ते का तयार होत नाहीत हे निर्मात्यांनाच विचारायला हवे.

क्षमतेत वाढ, नियम जसेच्या तसे

दुचाकी वाहनांचा प्रवास ३५ सीसीवरून आता १००० सीसींवर गेला आहे. देशात ५०० ते ६०० सीसीचे वाहन उपलब्ध आहेत. पण आरटीओच्या नियमांत बदल झालेला नाही. लायसन्सबाबत तेच जुने नियम सुरू आहेत.

वाहन नाही तर लायसन्स कसे?
परिवहन आयुक्त शेखर चन्ने म्हणाले की, १६ ते १८ वर्षांच्या किशोरांना ५० सीसी इंजिन क्षमतेचे दुचाकी वाहन चालवण्याचेच लायसन्स दिले जाऊ शकते. पण जर असे वाहन तयारच होत नसेल तर लायसन्सही मिळू शकत नाही.

X
COMMENT