आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्हाला आई-वडिलांपासून असे दूर करू नका...तंबाखूजन्य पदार्थांच्या विरोधात चिमुकल्यांचे पानठेलाचालकांना पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान मुले पानठेलाचालकांना पत्र व गुलाबपुष्प देऊन तंबाखूजन्य पदार्थ न विकण्यास सांगतात. - Divya Marathi
लहान मुले पानठेलाचालकांना पत्र व गुलाबपुष्प देऊन तंबाखूजन्य पदार्थ न विकण्यास सांगतात.

 नागपूर  - ‘आम्हाला आमचे आई-वडील अत्यंत प्रिय आहेत. त्यांना तंबाखूजन्य पदार्थ, खर्रा हे विष देऊन आमच्यापासून हिरावू नका. कृपया हे विषारी पदार्थ विकणे बंद करा..’ या आशयाचे पत्र घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील चिमुकली मुले शाळा सुटल्यावर पानठेल्यावर जातात.. पत्रासोबत एक गुलाबाचे फूल देऊन तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचे आवाहन ते करतात. 


ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात व्यसनमुक्तीचा मुक्तिपथ हा उपक्रम राबवला जात आहे. यात आता व्यसनमुक्तीसाठी शाळकरी मुलांची मदत घेतली जात आहे. त्याची सुरुवात आरमोरी तालुक्यातील देशपूर या गावातून झाली. शनिवारी शाळा सुटताच चिमुकले विद्यार्थी एकत्रितपणे शाळेलगत असलेल्या पानठेल्यावर दाखल झाले. मुलांना पानठेल्यावर पाहून गावकरी आणि पानठेलाचालकही चक्रावले. मात्र, मुलांनी तेथे पोहोचताच गुलाबाचे फूल आणि एक पत्र पानठेलाचालकास दिले. त्या पत्रात तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचे भावनिक आवाहन केले. 
 

 

विषारी पदार्थांची विक्री बंद करा...  

विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या पत्रात नमूद केले  की, ‘ आम्हाला  आई-बाबा प्रिय आहेत. त्यांना व गावकऱ्यांना तंबाखूजन्य पदार्थांचे विष खाऊन येणाऱ्या मरणापासून तुम्ही वाचवू शकता. त्यांना आमच्यापासून दूर करू नका. ही विक्री कृपया बंद करा..’

 

> गडचिरोली जिल्ह्यात शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथच्या वतीने विशेष प्रयत्न.
> प्रत्येक शाळेत तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित चित्रपट मुलांना दाखवले जातात.
> त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून शाळकरी मुलेही या उपक्रमात सहभागी.
 

बातम्या आणखी आहेत...