international / जपानमध्ये मुलांच्या खोड्यांचा विमा, शाळेत तोडफोड झाल्यास भरपाई विमा कंपनी देणार, खटल्याची कोर्ट फीदेखील भरणार

असा विमा उतरवणारी टोकियोची येल जगातील पहिली विमा कंपनी

वृत्तसंस्था

May 26,2019 02:39:01 PM IST

टोकियो - सर्वसाधारणपणे विमा कंपन्या आरोग्य, वाहन, प्रवास आणि घराचा विमा करतात. जपानमध्ये मात्र येल विमा कंपनी शाळेतील मुलांच्या खोड्यांचा विमा उतरवणार आहे. त्याअंतर्गत कंपनी पॉलिसीधारक पालकांच्या मुलांची काळजी घेईल. शाळेत मुलांने तोडफोड केल्यास नुकसान भरपाई देईल. समजा शाळेत दोन मुलांत भांडण झाले त्यात त्या मुलास शारीरिक इजा झाली तर विमा कंपनी त्याच्या उपचाराचा खर्चदेखील उचलणार आहे. एवढेच नव्हे तर, शाळा अथवा इतर मुलांच्या पालकांकडून खटला दाखल केला गेल्यास कोर्टाचे शुल्कदेखील विमा कंपनी भरणार आहे.


ही पॉलिसी घेण्यासाठी पालकांना महिन्याकाठी २४ डॉलर (सुमारे १६६५ रुपये) भरावे लागतील. अशा स्वरुपाचा विमा उतरवणारी येल ही जगातील पहिलीच विमा कंपनी असल्याचा दावा करण्यात आला आहे. जपानमध्ये शिक्षण, संस्कृती, क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अभ्यासानुसार, २०१७ मध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च महािवद्यालयातील मुलांच्या खोड्याशी संबंधित ४.१ लाख प्रकरणे समोर आली होती. २०१८ मध्ये ही संख्या वाढून पाच लाख झाली होती. यात मुलांशी संबंधित अडीच लाख प्रकरणे गंभीर होती. त्यात मुलांकडून हिंसक कृत्ये झाली होती. ही प्रकरणे कोर्टात गेली होती. येलच्या मते, पॉलिसी खरेदी केल्यानंतर पालकांना मुलांची चिंता करण्याची गरज नाही.

अनोख्या पॉलिसीमुळे देशभरात चर्चेत आली विमा कंपनी

या अनोख्या पॉलिसीमुळे देशभर कंपनीची चर्चा आहे. काही पालक खुश आहेत. मात्र, काही पालकांनी या पॉलिसीला विरोध केला आहे. लोकांच्या मते, अशी पॉलिसी देऊन कंपनी मुलांना खोड्या करण्यास प्रोत्साहन देत आहे. अशी पॉलिसी घेतल्यानंतर पालक मुलांकडे फारसे लक्ष देणार नाहीत. याचा मुलांवर वाईट परिणामही होऊ शकतो. एका वृत्तानुसार जपानमध्ये मुलांच्या खोड्यांशी निगडित प्रकरणांत वाढ झाल्याने पालक चिंतित असतात. मात्र, ते यावरून मुलांशी फारशी चर्चा करत नाहीत. अशात ही पॉलिसी पालकांसाठी उत्तम ठरू शकते.

X
COMMENT