आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलांचा तान्हा पोळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या देशात विविध सणवारांच्या परंपरा चालत आलेल्या आहेत. अनेक राज्यांत सण साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. विदर्भात व-हाडी पोळ्याचा आनंद मी चंद्रपूरला असताना घेतला आहे. पोळा आला की चार दिवस आधीपासूनच चौकात सुंदर रंगीबेरंगी लाकडी बैलजोड्यांचा मोठा बाजार भरलेला असतो. गणपती विक्रीस येतात त्याप्रमाणे आकर्षक, सुंदर रंगात रंगवलेले बैल विक्रीस उपलब्ध असतात. लहान-मोठ्या आकारातही बैल मिळतात. लहान मुले आपल्या आवडीनुसार बैल खरेदी करतात. या बैलांना चार चाके आणि दोरी बांधायला समोर हूक लावलेला असतो. एकदा खरेदी केलेला बैल दोन-तीन वर्षे रंगरंगोटी करून पुन्हा-पुन्हा वापरात येतो. घरी रांगोळी काढून बैलांना विराजमान केले जाते. या बैलांना गोंडे, माळा घालून घंटा बांधून भरजरी वस्त्रे पाठीवर घातली जातात. फुलांच्या हारांनीही बैलांची सजावट केली जाते.

घरची लहान -मोठी मंडळी मिळून पूजा-आरती क रतात. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून हा दिवस आनंदात साजरा केला जातो. दुस-या दिवशी ‘तान्हा पोळा’ साजरा केला जातो. हा लहान मुलांचा सण असतो. सर्व लहान मुले आपापले लाकडी बैल ओढत नेऊन मारुतीच्या मंदिरात एकत्र येतात. मारुतीसमोर नारळ वाढवला जातो. त्यानंतर लाकडी बैलांची मिरवणूक काढली जाते. सर्व धर्मांतील मुले या मिरवणुकीत सहभागी झालेली असतात. आकाराने लहान-मोठ्या असलेल्या बैलांचा मेळावा बघण्यास प्रचंड गर्दी असते. या वेळी लहान मुलांच्या आनंदास पारावार नसतो. बैलांच्या सजावटीवर बक्षिसे जाहीर केली जातात. एवढा मोठा बैलांचा समुदाय पाहून हे बैल बोलके तर नाहीत ना... असा मला भास झाला होता. आता ट्रॅक्टरचा जमाना आला आहे, परंतु महाराष्‍ट्रात विशेषत: विदर्भात आजही बैलांना पूजनीय मानले जाते. हीच बेैलं वर्षभर आपल्या शेतात राबतात. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. हीच आपल्या सणाची खरी ओळख आहे.