चीनचे लष्करी बळ अमेरिकेपेक्षा कमी
अमेरिकेच्या लष्करी बळाला आव्हान देण्याची चीनची क्षमता नसून तैवान वेगळा काढण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या फुटीरतावाद्यांचा सामना करण्याएवढीच आमची ताकद आहे
-
बिजींग - अमेरिकेच्या लष्करी बळाला आव्हान देण्याची चीनची क्षमता नसून तैवान वेगळा काढण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या फुटीरतावाद्यांचा सामना करण्याएवढीच आमची ताकद आहे, असे सांगत चिनी लष्कराचे जनरल चेन बिंगदे यांनी चीनच्या वाढत्या लष्करी सार्मथ्याबाबत अमेरिकेतील चिंता सौम्य करण्याचा प्रयत्न केला.
कित्येक दशकांच्या आर्थिक सुधारणा आणि उदारीकरणानंतर देशाचे संरक्षण आणि लष्करी बळ वाढवण्याची प्रक्रिया ही 'भरपाई'च्या स्वरुपाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे नौदलप्रमुख माइक म्युलन आणि लष्करप्रमुख यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमेरिकेच्या नौका आणि विमाने चीनच्या किनाऱ्यावर टेहळणी करत आहेत, याबाबत चीनमध्ये संताप असल्याचे ते म्हणाले.
चीनचे पंतप्रधान हू जिंताओ आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यातील सहमतीनुसार, दोन्ही देशांमधील लष्करी संबंध व परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्याचा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे.
चीन व अमेरिका यांच्यातील राजनैतिक व आर्थिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी लष्करी सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचे म्यूलन यांनी सांगितले.