आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीजिंग - अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असे त्रिवार सांगणारे व तैवानला स्वतंत्र देश दर्शवणारे सुमारे ३० हजार नकाशे चीनने नष्ट केले आहेत. विशेष म्हणजे हे नकाशे चीनमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये मंगळवारी यासंबंधीचा दावा करण्यात आला आहे. या नकाशांना इतर देशांत पाठवले जाणार होते. ते नेमके कोणत्या देशात पाठवले जाणार होते, हे मात्र स्पष्ट नाही. नकाशे नष्ट करणे वैध आहे. चीनचे सार्वभौमत्व व क्षेत्रीय अखंडत्वासाठी हे महत्त्वाचे असल्याचा दावा चीन सरकारकडून करण्यात आला. तैवान व दक्षिण तिबेट हे दोन्ही क्षेत्र चीनचे प्रदेश आहेत. चीन या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कायद्याचे अनुसरण करत आहे. भारत व चीन यांच्यातील नियंत्रण रेषा ३ हजार ४८८ किमी लांबीची आहे. सीमाप्रश्न सोडवण्यासाठी उभय देशांत २१ वेळा चर्चा झाली, परंतु त्यातून काहीही तोडगा निघू शकला नाही.
अरुणाचलला भारतीय नेत्यांच्या दौऱ्यांनाही विरोध
अरुणाचल हा आपला भाग असल्याचे चीनला वाटते. दक्षिण तिबेट या आपल्या ताब्यातील प्रदेशातच अरुणाचल आहे, असे चीनचे म्हणणे आहे. म्हणूनच गेल्या महिन्यातील मोदी यांच्या अरुणाचल दौऱ्यास विरोध दर्शवला होता. तिबेटमधील धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल दौऱ्यावरही चीनने विरोध दर्शवला होता. लामांनी अरुणाचलला भेट दिल्यानंतर तेथील ९ ठिकाणांचे नामांतरही चीनने केले होते.
अरुणाचलसंबंधी दोन वाद, ११५ वर्षांपासून रखडलेले
तिबेट : चीन मॅकमोहन सीमा मानत नाही, करार नसल्याचा दावा
तिबेट व ईशान्य भारत या दरम्यान मॅकमोहन रेषा आंतरराष्ट्रीय सीमा आहे. १९१४ मध्ये भारताचे तत्कालीन ब्रिटिश सरकार व तिबेट यांच्यात सिमला करार झाला होता. त्याचे नाव तत्कालीन परराष्ट्र सचिव हेन्री मॅकमोहन यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. बहुतांश सीमा रेषा भूतानपासून ८९० किमी, तर पूर्वेत ब्रह्मपुत्र नदी भागात २६० किमीपर्यंत आहे. चीनने ही सीमा मानण्यास नकार दिला आहे. समझोत्यावेळी चीन स्वायंत्त देश नव्हता. चीनच्या सरकारी नकाशावर मॅकमोहन रेषेजवळ ६५ हजार चौरस किमी क्षेत्र तिबेट म्हणून संबोधलेले आहे. पूर्वी चीन अरुणाचलच्या उत्तरेकडील तवांगवरही दावा सांगता होता.
भूतान : डोकलाममध्ये रस्ते बनवण्याचा चीनचा मनसुबा, भारताचा विरोध
डोकलाम जंक्शन आहे. येथे भारत-चीन-भूतानच्या सीमा एकत्र येतात. भारताने या प्रदेशात कसलाही दावा केलेला नाही. येथे चीनचा ताबा आहे. परंतु भूतान डोकलामवर दावा सांगतो. भारत व भूतान यांच्यात सैन्य सहकार्य करार आहे. त्यानुसार एखाद्या देशाने भूतानवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास भारत त्याच्याविरोधात कारवाई करू शकतो. चीन डोकलाममध्ये रस्ते बनवू इच्छितो. भारत त्यास विरोध दर्शवतो. तेव्हा चीन भूतानची दुसरी सीमा अरुणाचलमध्ये हस्तक्षेप वाढवू लागतो. डोकलाम भारतीय लष्करासाठी महत्त्वाचे आहे. युद्धादरम्यान भारताला येथील उंच शिखरांचा उपयोग होऊ शकतो. भारतीय सैन्याला या भागातील हिमालयीन प्रदेशाची चांगली माहिती आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.