आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींच्या दौऱ्यावर चीनची तिसऱ्यांदा नाराजी; अरुणाचल भेटीस आक्षेप, 2015, 2018 मध्येही विरोध 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी- पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पूर्णपणे निवडणुकीच्या रंगात न्हाऊन गेले आहेत. शनिवारी ते ईशान्येकडील राज्यांच्या दौऱ्यावर होते. त्यांनी अरुणाचल प्रदेश, आसाम व त्रिपुरातील अनेक लोकोपयोगी प्रकल्पांचे भूमिपूजन केले. त्याचबरोबर तीन राज्यांत जाहीर सभाही घेतल्या. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला या क्षेत्रात कडाडून विरोध होत असतानाच मोदी येथील दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्याविरोधात निदर्शनेही झाली. त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. दुसरीकडे मोदींच्या अरुणाचल दौऱ्यावर चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली. पाच वर्षांत मोदींच्या दौऱ्यावर नाराजी व्यक्त करण्याची ही तिसरी वेळ आहे. मोदींच्या अरुणाचलला जाण्यावर चीनने आक्षेप घेतला आहे. मोदी फेब्रुवारी २०१५ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा अरुणाचलला गेले होते. दुसऱ्यांदा फेब्रुवारी २०१८ मध्ये गेले होते. तेव्हा चीनने तीव्र आक्षेप घेतला होता. राष्ट्रपती कोविंद, दलाई लामांच्या भेटींवरही चीनने नाराजी व्यक्त केली होती.

 

चीन : अरुणाचलला मुळीच मान्यता नाही, भारतीय नेत्याच्या दौऱ्यास विरोध दर्शवतो 
चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले, चीनने कथित अरुणाचलला कधीही मान्यता दिलेली नाही. म्हणूनच आम्ही भारतीय नेत्याच्या चीन-भारत सीमेच्या पूर्वेकडील भागाला दिलेल्या भेटीचा तीव्र विरोध करतो. द्विपक्षीय संबंध व हिताचा विचार करून आमच्या चिंतांचा सन्मान करावा, अशी आमची भारताला विनंती आहे. त्याचबरोबर द्विपक्षीय संबंध गतिमान करण्याचे प्रयत्न हवे. भारताने वाद निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करणे टाळायला हवे. 

 

भारत : अरुणाचल आमचा अविभाज्य भाग, भारतीय नेत्याची नेहमीप्रमाणे भेट 
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे आक्षेप फेटाळून लावले. अरुणाचल हा भारताचा अविभाज्य घटक आहे. आमचे नेते इतर राज्यांप्रमाणे वेळोवेळी अरुणाचलला भेट देतात. चीनला या भूमिकेबद्दल अनेकदा अवगत करण्यात आले आहे. वास्तविक चीन अरुणाचलला दक्षिण तिबेटचा भाग मानते. सीमावाद मिटवण्यासाठी भारत-चीनमध्ये आतापर्यंत चर्चेच्या २१ फेऱ्या झाल्या आहेत. 

 

नागरिकत्व विधेयक : भारतमातेच्या सर्व पुत्रांसाठी 
मोदींनी गुवाहाटीत ईशान्येकडील जनतेला नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून सुरक्षेची खात्री दिली. चौकशी सुरू असलेल्या कोणत्याही व्यक्तीला नागरिकत्व दिले जाणार नाही. पीडित आणि घुसखोर यांतील फरक समजून घ्यायला हवा. नागरिकत्व विधेयक केवळ ईशान्येसाठी नव्हे तर भारतमातेवर श्रद्धा ठेवणाऱ्या पुत्रांसाठी आहे. 

 

एनआरसी : ईशान्येची भाषा, हक्कांचे संरक्षण करणार 
एनआरसीच्या अंमलबजावणीस मागील सरकार धजावत नव्हते. त्यावर आम्ही काम केले. त्यावरून लोक संभ्रम निर्माण करत आहेत. आसामसह ईशान्येकडील भाषा, संस्कृतीच्या संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे. आसाम करारातील कलम ६ लागू केले जाईल, असे वचन मोदींनी दिले. 

 

विकास : अरुणाचलमध्ये भुयारी मार्ग, विमानतळाचे भूमिपूजन 
मोदींच्या हस्ते अरुणाचलात ४ हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. होल्लोगीत ग्रीनफील्ड विमानतळ, सेला भुयारी मार्गाचे भूमिपूजन केले. दूरदर्शनच्या अरुणा प्रभा वाहिनीचा प्रारंभ केला. ११० मेगावॅटच्या जलविद्युत प्रकल्प, विमानतळ व डोंगरी राज्यांत १० आरोग्य, कल्याण केंद्रांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. 
 

बातम्या आणखी आहेत...