आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • China The Super Space Power Article By Shripad Sabnis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रासंगिक: अदृश्य चंद्रावर पाऊल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या पृष्ठभागावर चीनने राेबाेटिक 'चँग'ई-४ हे अंतराळयान उतरवले आणि अनाेखा इतिहास घडला. चिनी दंतकथेत चंद्रावरून उडत जाणाऱ्या 'चँग'ई देवतेचा उल्लेख येताे, त्या देवतेचे नाव यानाला देण्यात आले हे विशेष. अर्थात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केलेले प्रयत्न चीनला 'सुपर स्पेस पाॅवर' बनवू जात आहेत. याची प्रचिती या अतर्क्य, कल्पनातीत अशा माेहिमेतून येते. चंद्राचा दक्षिण ध्रुव असलेल्या एंटकेन बेसिनच्या पृष्ठभागावर हे यान उतरवण्यात चीनला यश आले, जाे चंद्राचा अदृश्य भाग मानला जाताे. खरे तर चंद्राच्या अस्पर्शित भागात यान उतरवणे हे जसे आव्हानात्मक तितकेच जाेखमीचे हाेते. या भागातून चंद्र आणि पृथ्वीदरम्यान थेट संपर्क हाेणे शक्यच नव्हते. त्यामुळे चीनने पुन्हा दंतकथेचा आधार घेत 'मॅगपी पूल' उभारला. चिनी चांद्रमाेहीम जशी रहस्यमय तसेच या पुलाची कथादेखील रंजक आहे. चिनी दंतकथेतील उल्लेखाप्रमाणे स्वर्गदेवतेच्या सातव्या मुलीचा पती आकाशगंगेमुळे तिच्यापासून दुरावताे. विरह सहन न झाल्यामुळे ती त्यास भेटायला निघते.

दरम्यान, सातव्या महिन्याच्या सातव्या दिवशी मॅगपी पक्ष्यांनी पृथ्वीपासून चंद्रापर्यंत पंखाचा पूल तयार केला आणि या पंखाच्या पुलावरून ती चंद्रावर पाेहाेचते. म्हणून या पुलास 'मॅगपी पूल' संबाेधले जाते. अर्थात, चंद्राच्या अदृश्य भागावरील 'लुनार लँडर' आणि 'राेव्हर' पर्यंत पृथ्वीवरील सिग्नल पाेहाेचवण्यासाठी 'क्वँकिआओ' हा रिले उपग्रह पृथ्वीपासून ४ लाख किमी अंतरावर स्थिर केला, त्यास 'मॅगपी पूल' असे नाव दिले. या अदृश्य किंबहुना अस्पर्शित भागाची खगाेलीय माहिती जाणून घेण्याचा, राेप उगवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बटाटा, अरबीडाॅप्सिस, रेशीम किड्यांच्या अंड्यावर जीवशास्त्रीय प्रयाेग केले जाणार आहेत.

 

साैरमालेची निर्मिती हाेत असताना चंद्र नेमका कसा आकार घेत राहिला याचा शाेध घेण्यासाेबतच सौरमालेच्या अभ्यासासाठी 'चँग ई-४'चा उपयोग होऊ शकेल. अवकाशातील ग्रहगोल रेडिओ लहरींचे उत्सर्जन करतात. या लहरींचे ग्रहण करून स्रोतांबाबतचा अंदाज करण्याचे शास्त्र म्हणजे रेडिओ अॅस्ट्रॉनॉमी. पृथ्वीवर अनेक ठिकाणी रेडिओ अँटिना उभारून या लहरींचे ग्रहण केले जाते. मात्र, पृथ्वीवर रेडिओ लहरींची गर्दी झाली असल्याने त्याविषयीच्या अभ्यासात अडचणी वाढत आहेत. चंद्राची अदृश्य बाजू ही अशा रेडिओ लहरींपासून बरीच दूर आहे. त्यामुळे तिथे रेडिओ अॅस्ट्रॉनॉमीचे प्रयोग करता येतील का, याचा देखील संशोधक विचार करीत आहेत. 

 

सन २०३० पर्यंत अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिका आणि रशियाची बरोबरी करण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे. याचाच एक भाग म्हणजे पुढच्या वर्षी चीन मानवी अवकाश मोहीम राबविणार आहे. त्यासाठी अंतराळ स्थानकाची निर्मिती करण्यात येत आहे. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अवकाश संशोधन करण्यातही चीन अग्रेसर असून उपग्रहविरोधी क्षेपणास्त्रांची चाचणीही घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही २०२० पर्यंत 'अंतराळ दल' स्थापन करण्याची घोषणा केली आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या वर्षी अमेरिकेने ३४ तर रशियाने २० उपग्रह प्रक्षेपित केले. २०१६ साली अमेरिकेने अंतराळ कार्यक्रमावर तब्बल ३६ अब्ज डॉलर खर्च केले, तर चीनने ५ अब्ज डॉलरहूनही कमी खर्च केला होता. अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिका, चीन यांच्याप्रमाणेच भारतानेही स्वत:चे स्थान निर्माण केले आहे, हे या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय ठरावे. चांद्रभूमीवर पहिले मानवी पाऊल पडल्याच्या घटनेचा (१६ जुलै १९६९) सुवर्णमहाेत्सव येत्या जुलैमध्ये साजरा हाेईल. या ५० वर्षांत अमेरिका, रशियापाठाेपाठ भारत, चीन, जपान आणि युराेपीय समुदाय देखील चांद्रमाेहिमेत सामील झाला. अर्थात, संशाेधन ही या माेहिमेची गरज असली तरी, क्षमता सिद्ध करण्याची ईर्षादेखील दडून राहिलेली नाही. चांद्र आणि मंगळ माेहीम यशस्वी केल्यानंतर भारत आता सूर्यावर स्वारी करण्याच्या तयारीला लागला आहे. 'इस्राे'चे 'आदित्य' हे यान २०२० मध्ये तळपत्या सूर्याकडे झेपावणार असल्याचा विश्वास 'इस्राे'च्या संशाेधकांनी व्यक्त केला आहे. 

 

तळपत्या सूर्यावर काेणतेही यान उतरवणे शक्य नाही, त्यामुळे पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावर विविध पेलाेड स्थिर ठेवून सूर्याचा अभ्यास करावा लागणार आहे. तथापि, चीनने चंद्राच्या अदृश्य भागात यान पाठवून इतिहास घडवत असतानाच खगोल शास्त्रज्ञांना भविष्यात रेडिओ लहरींद्वारे विश्वाचा अभ्यास करण्यासाठी नवी जागा उपलब्ध केली. या अनुषंगाने ही मोहीम नक्कीच महत्त्वपूर्ण ठरते.