आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांना हुवावेचा फोन मोफत वाटताहेत चिनी कंपन्या; आयफोनचा वापर न करण्याची ताकीद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- अमेरिकेमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील चिनी कंपनी हुवावेवर बंदी घालण्यात आल्याने याचे परिणाम अॅपलला सहन करावे लागत आहेत. चीनमधील अनेक कंपन्या हुवावेच्या समर्थनासाठी पुढे सरसावल्या आहेत. या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना आयफोनऐवजी हुवावेचे स्मार्टफोन वापरण्यास सांगत आहेत. तसेच चिनी कंपनीचे फोन खरेदी करण्यासाठी १० ते २० टक्के सवलत देत आहेत. काही कंपन्यांनी तर हुवावेचे फोन मोफत देण्याचीही ऑफर दिली आहे. सुमारे दोन डझन कंपन्यांनी सोशल मीडियावर हुवावेचीच उत्पादने खरेदी करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये तंत्रज्ञानापासून ते फूड क्षेत्रापर्यंतच्या कंपन्यांचा समावेश आहे. पूर्ण चीनमध्ये शेकडो कंपन्यांनी हुवावेच्या समर्थनार्थ अभियान सुरू केले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
 
हुवावे फोन खरेदीची पावती दाखवल्यास दारू मोफत :
इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शांघाय यूलूक इलेक्ट्रॉनिक अँड टेक्नॉलॉजीने प्रत्येक कर्मचाऱ्याला हुवावेचे दोन स्मार्टफोन मोफत देण्याची ऑफर दिली आहे. शिनचेन टेक्नॉलॉजी कंपनी हुवावे किंवा झेडटीईचे फोन घेतल्यास १८ टक्क्यांपर्यंत पैसे देण्याचे आश्वासन देत आहे. हेनान राज्यातील एका कंपनीची ऑफर आहे की, जो कर्मचारी हुवावेचे डिव्हाइस खरेदी केल्याची पावती देईल, त्याला त्या डिव्हाइसच्या किमतीच्या ३० टक्क्यांपर्यंतच्या रकमेची दारू मोफत दिली जाईल.
 
बोनस न देण्याचा आणि नोकरीवरून काढण्याचा इशारा :
काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना अॅपल फोनचा वापर सोडण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच शेनझेनमधील एका कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला की, जर त्यांच्याकडे अॅपलचा फोन दिसला तर तो जप्त करण्यात येईल. त्यानंतरही त्यांनी अॅपलचा फोन वापरला तर त्यांना नोकरीवरून काढले जाईल. हुवावेचे मुख्यालय शेनझेनमध्ये आहे. काही कंपन्यांनी आयफोनच्या किमतीएवढा दंड लावण्याचा, तर काही कंपन्यांनी बोनस देणार नसल्याचा इशारा दिला आहे.  

ज्या देशासोबत चीनच्या सरकारचे संबंध बिघडतात, चिनी त्या देशांच्या उत्पादनावर बहिष्कार टाकतात. २०१२ मध्ये एका बेटाच्या मालकी हक्कावरून जपानसोबत वाद झाला होता, त्या वेळी चिनी नागरिकांनी जपानी कंपन्यांचे अनेक स्टोअर नष्ट केले हाेते. गेल्या वर्षी दक्षिण

कोरियाच्या ह्युंदाई मोटर्सलाही येथे मोठा विरोध झाला होता.  

 

अमेरिकेच्या सांगण्यावरून कॅनडामध्ये हुवावेच्या सीएफओंना झाली अटक
अमेरिकेच्या सांगण्यावरूनच कॅनडाने एक डिसेंबर रोजी व्हँकुव्हरमध्ये कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) मेंग वांगझू यांना अटक केली आहे. अमेरिकेने बंदी घातल्यानंतरही कंपनीने अमेरिकी उपकरणे इराणला विकली असल्याचा कंपनीवर आरोप आहे. विशेष म्हणजे याची माहिती आर्थिक संस्थांनी लपवली. चीनच्या सरकारने आणि हुवावेने हे आरोप फेटाळले आहेत. त्यानंतर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने कॉर्पोरेट जगताला हुवावेचे समर्थन करण्यास सांगितले होते. कम्युनिस्ट यूथ लीगने सोशल मीडियावर लेख पोस्ट केला आहे, ज्यात कंपन्यांकडे हुवावेची उत्पादन खरेदी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सबसिडी देण्याची मागणी केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...