हरिद्वार / बलात्कारातील आरोपी चिन्मयानंदची होणार हकालपट्टी

पीडितेवर पैसे वसुलीचा गुन्हा?

Sep 23,2019 07:43:00 AM IST

हरिद्वार/ शहाजहांपूर : भाजप नेता व माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद याची हकालपट्टी करण्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेची १० ऑक्टोबरला बैठक होत असून यात सर्व आखाडे सहभागी होतील. संत समाजानेही चिन्मयानंदची संत ही उपाधी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, जोपर्यंत चिन्मयानंद याच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपातून तो निर्दाेष ठरत नाहीत तोवर त्याला संत समाजाबाहेर ठेवले जाईल. दरम्यान, या प्रकरणी तपास करणाऱ्या उत्तर पोलिस पोलिसांचे विशेष पथक सोमवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात तपास अहवाल सादर करणार आहे. एसआयटीसह पीडित विद्यार्थिनी अलाहाबाद उच्च न्यायालयात हजर राहण्यासाठी रविवारी शहाजहांपूरहून रवाना झाले आहेत. चिन्मयानंद सध्या बलात्काराच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असून लॉ कॉलेजच्या एका विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.


पीडितेवर पैसे वसुलीचा गुन्हा? : या प्रकरणात पीडितेवर पैसे वसुलीसह पुरावे नष्ट करण्यासंबंधी गुन्हा दाखल होऊ शकतो. एसआयटीनुसार, पीडितेचे मित्र संजय सिंह आणि दोन चुलत भाऊ सचिन व विक्रम यांनी चिन्मयानंदकडून पैसे वसूल करण्यासाठी फोन केला होता. या कटात पीडिताही होती. चिन्मयानंदच्या अटकेनंतर एसआयटीने तीन युवकांना या आराेपावरून अटक केली होती.

X