आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाम कसा घडला त्याची गोष्ट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘श्यामची आई’ हा आचार्य अत्रेंची निर्मिती असलेला आणि पहिलं राष्ट्रपती सुवर्णपदक मिळालेला चित्रपट. त्याचं चित्रीकरण १९५३ मध्ये पूर्ण होऊन तो प्रदर्शित झाला. या सिनेमात श्यामची भूमिका साकारलेल्या माधव वझे यांनी अलीकडेच ‘श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी’ या पुस्तकात त्या वेळच्या आठवणी लिहिल्या आहेत. राजहंस प्रकाशनाने १३८ पृष्ठांचं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. 

 

त्रपटात श्यामच्या आईची भूमिका करणाऱ्या वनमालाबाईंच्या निधनानंतर माधव वझेंच्या लक्षात आलं की ‘श्यामची आई’ या अप्रतिम चित्रपटाच्या निर्मितीचे आणि नंतरच्या घटनांचे आपण एकमेव साक्षीदार मागे राहिलो आहोत. त्यांना हेही जाणवलं की, बरीच वर्षं मनातच राहिलेल्या आठवणी आणि किस्से या इतिहासाचा भाग आहेत. त्या लिहून काढणं म्हणजे निव्वळ स्मरणरंजन नाही. म्हणून, इतक्या वर्षांनंतरही त्यांनी मनावर घेतलं आणि एका ऐतिहासिक चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळच्या घटनांचं एक प्रकारे डॉक्युमेंटेशन तयार झालं. 

लोकांच्या मनात माधव वझे आणि ‘श्यामची आई’ हे समीकरण इतकं पक्कं झालेलं आहे की, त्यांच्या कामाबद्दल त्यांच्याशी आवर्जून कोणी बोललं नाही, असा एक दिवस - शब्दश: एकही दिवस गेल्या साठ वर्षांत गेलेला नाही हे त्यांनी नमूद केलं आहे. मोठं झाल्यानंतर देशात तसंच परदेशातही फिरताना त्यांना ‘श्याम’ म्हणून ओळखणारी माणसं भेटली. तसंच, व्हिसा मिळणं, रुपये बदलून डॉलर्स मिळणं अशासारख्या कठीण प्रसंगीदेखील त्यांना ‘श्याम’ म्हणून ओळखून लोकांनी प्रेमाने मदत केली. 

 

हा चित्रपट तयार होत होता तेव्हा ते शाळेत शिकत होते आणि चित्रीकरणासाठी जवळजवळ एक वर्षभर त्यांना घरापासून लांब राहावं लागलं. चित्रपटसृष्टी आणि तिथलं वातावरण हे सगळंच त्यांच्यासाठी अनोळखी होतं. त्यामुळे त्यांना तिथे एकटं वाटत असे. या एकटेपणाचा परिणाम असा झाला की, तेव्हाच्या त्या प्रत्येक अनुभवाचे ठसे मनात खोलवर उमटत गेले. चित्रपट घडण्याच्या प्रक्रियेत ते अतिशय उत्सुकतेने सामील झाले होते. अनेक प्रसंगांचं चित्रीकरण करतानाचे त्यांनी टिपलेले बारकावे वाचताना तो चित्रपट जणू प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांसमोर तयार होतोय असंच वाटत राहातं. 

 

या पुस्तकाच्या नावात आचार्य अत्र्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांच्यामुळे ‘माधव वझे’ हे नाव, ही ओळख आपल्याला मिळाली हे त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केलं आहे. तसंच, आचार्य अत्रेंच्या विलक्षण प्रतिभेचा आणि विवेकबुद्धीचा प्रत्यय घेतल्याचे असंख्य क्षण त्यांच्याजवळ जमा राहिले. 

 

इतरांप्रमाणे वझेही आचार्य अत्रेंना साहेब म्हणत. सुरुवातीला त्यांच्या मनात साहेबांविषयी असणारी एक प्रकारची आदरयुक्त भीती हळूहळू कमी कमी होत गेली. साहेबांनी अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने माधवची काळजी कशी घेतली आणि त्यामुळे आपण स्वत:ला कसे ‘मोठा माणूस’ समजू लागलो होतो तेही मोकळेपणाने सांगितलंय. पण हे लिहिताना कुठेही बढाईखोरीचा आव नसून एका लहान मुलाच्या मनात आपुलकीच्या नात्याने निर्माण झालेला आत्मविश्वास, बुजरेपणा जाऊन येत गेलेली धिटाई आणि साहेबांविषयी वाटणारं ममत्वच जाणवत राहातं.

 

श्यामची निवड कशी झाली इथपासूनचे सगळे प्रसंग यात आहेत. आचार्य अत्र्यांच्या ज्योती स्टुडिओमध्ये बरंचसं चित्रीकरण केलं गेलं. त्या वेळी तिथे लावले जाणारे गावातले-घरातले-देवघरातले-शाळेतले सेट्स, त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची जमवाजमव, प्रसंगानुसार दृश्यं टिपता यावीत म्हणून हर्णै बंदर, कोकण, पुणे अशा ठिकाणी केलेली भ्रमंती, संवाद लिहित असताना त्यात आयत्या वेळी करावे लागणारे बदल, कोणता प्रसंग काय कारणांनी पुन्हा-पुन्हा चित्रित करावा लागला, असे बरेच तपशीलही  आहेत. 

 

उदाहरणादाखल एक प्रसंग. श्यामच्या आईने घरी केलेला खरवस घेऊन श्यामचे वडील भाऊ त्याच्या दापोलीच्या शाळेत जातात. श्याम आणि त्याचे शाळासोबती खरवसाचा फन्ना उडवतात. या प्रसंगासाठी बराच शोध घेऊनही खरवस काही वेळेवर मिळाला नाही. वाट बघण्यात बराच वेळ फुकट जाऊ लागला. म्हणून आचार्य अत्रेंना एक कल्पना सुचली. त्यांनी पाव आणि पिवळं बटर मागवून त्या पावाचे बटर लावलेले तुकडे कॅमेऱ्यातून कसे दिसताहेत ते बघितले. हुबेहूब खरवस! माधव वझे लिहितात, ‘आम्ही गोड खरवस म्हणून तो खारट लोणी लावलेला पावच मिटक्या मारत खाल्ला.’


चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्याला पुरेसा प्रतिसाद मिळावा म्हणून ठिकठिकाणी श्यामचा सत्कार घडवून आणण्याची आचार्य अत्र्यांची कल्पना, राष्ट्रपतींचं पहिलं सुवर्णपदक या चित्रपटाला मिळालं ते घेण्यासाठी सगळे दिल्लीला गेले त्या वेळचे प्रसंग त्यांनी विस्ताराने लिहिले आहेत. आचार्य अत्रे, वनमालाबाईदेखील त्या वेळी तिथे होते. माधव वझे त्यांच्या काकांसोबत त्या कार्यक्रमासाठी गेले होते. पारितोषिक वितरण झाल्यानंतर भोजन समारंभ आयोजित केला होता. जेवण झाल्यानंतर त्या समारंभाची गंमत बघत ते एका बाजूला उभे होते. छोट्या माधव वझेंना तिथे मजा वाटत होती. मात्र, वनमालाबाईंनी त्यांना त्या वातावरणात फार वेळ थांबू न देता ते राहत होते त्या हॉटेलवर परतण्यास भाग पाडलं.

 

वयाने सर्वांत लहान आणि भूमिका मध्यवर्ती असल्याने चित्रपटातील इतर कलाकारांशीही त्यांची जवळीक निर्माण होत गेली. श्यामच्या आईचं काम केलेल्या वनमालाबाईंशी त्यांचे सूर इतके छान जुळले की, त्या जणू त्यांची खरी आईच असल्याप्रमाणे त्यांना वाटत असे. त्यांच्याकडच्या स्वाक्षरीच्या वहीत वनमालाबाईंची सही का घ्यावी, असा त्यांना प्रश्न पडला. आपल्या आईची का कुणी सही घेतं असंच त्यांना वाटत होतं.

 

दूर्वांची आजी झालेल्या सरस्वतीबाई बोडस प्रेमाने म्हणत, ‘आमच्या या श्यामचा कधी तरी मी पापा घेणार!’ आणि खरोखरच त्यांनी तो एका प्रसंगात इतक्या सहजतेने घेतला की, खुद्द श्यामलाही तो घेतलेला समजला नाही. आणि नंतर त्या त्याला चिडवत राहिल्या, ‘बघ, घेतला की नाही पापा...’


वनमालाबाई, सरस्वतीबाई बोडस, पुराणिकबुवा झालेले प्रबोधनकार ठाकरे, नानाआजोबा झालेले बाबूराव पेंढारकर यांच्या अभिनयातल्या आणि त्या-त्या दृश्यानुसार त्यांचे हावभाव, देहबोली यांच्यातील सहजता माधव वझेंनी बारकाईने टिपली आहे. एकंदरीतच, कलाकार काय किंवा सेटवरील दामूअण्णा, रेळेकाका असे आचार्य अत्र्यांचे सहायक काय, सगळ्यांच्याच कामातील चोखपणा आणि चित्रपट उत्तम व्हावा यासाठी केलेली धावपळ-धडपड सविस्तर लिहिली आहे. हे सगळं वाचताना आपणही जणू श्याम आहोत असंच वाटत राहातं. 

 

माधव वझेंच्या मनात चित्रीकरणाच्या वेळी भेटलेल्या या सगळ्याच माणसांविषयी आपुलकी निर्माण झाली. काही वर्षांनी अचानक यातील काही जणांच्या भेटी झाल्या तेव्हा त्या वेळची तीच ओळख मनात कायम होती. परंतु, बदललेल्या परिस्थितीमुळे त्या माणसांची झालेली दुरवस्था बघून, चित्रपट-व्यवसायाचं क्षणभंगुरत्व जाणवून त्यांना खूप हळहळायला झालं.

 

‘श्यामची आई’ या चित्रपटाने आपल्याला काय दिलं याचा विचार करताना त्यांच्या लक्षात आलं की, त्या किशोर वयामध्ये नकळतपणे काही गोष्टींची रुजवात झाली जी त्यांना प्राध्यापक झाल्यावर विद्यार्थ्यांना शिकवताना वेळोवेळी जाणवत राहिली.

 

पुस्तकाच्या शेवटच्या भागात त्यांनी ‘श्यामची आई’ या साने गुरुजींच्या पुस्तकाविषयी आपलं स्पष्ट मत नोंदवलं आहे. ते ठामपणे सांगतात, की ‘साने गुरुजींचं ‘श्यामची आई’ हे पुस्तक ‘लहान मुलांसाठी’ नसून खरंतर प्रौढ स्त्री-पुरुष वाचकांसाठीच आहे.”

 

रविमुकुल यांनी या पुस्तकाच्या मुखपृष्ठाची व आतल्या छायाचित्रांची मांडणी केली आहे. मुखपृष्ठावर चित्रपटाचं पोस्टर, आचार्य अत्रेंचं सुवर्णपदक घातलेलं आणि माधव वझे यांचं अलिकडच्या काळातील छायाचित्र आहे. पुस्तकाच्या आतल्या भागात चित्रपटातील आणि त्यानंतरची काही छायाचित्रं आहेत. त्यामुळे पुस्तक वाचताना चित्रपट बघत असल्याचीही जाणीव होत राहाते.

 

‘श्यामच-ी आई’ हे शाळकरी वयातलं आवडतं पुस्तक होतं. तेव्हा त्याची पारायणं केली होती. आणि नंतर चित्रपट, त्यातील श्याम हेही आवडले होते. त्या श्यामनेच लिहिलेलं, चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं तेव्हाच्या, ६४-६५ वर्षांपूर्वीच्या आठवणींचं, हे पुस्तक वाचल्यानंतर पुन्हा चित्रपट बघितला की, एकीकडे हे पुस्तकही आठवत राहातं. त्याच वेळी श्यामशी, त्याच्या आईशी, त्या वातावरणाशी आजही जोडलेलं असण्याची सुखद जाणीव मनभर पसरून राहाते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...