आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टवाळखोरांचा एकावर चॉपरने हल्ला, पिस्तूल रोखून ठार मारण्याची धमकी; मध्यरात्री कांचननगरातील उज्ज्वल चौकात धिंगाणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी झालेला रिक्षाचालक - Divya Marathi
जखमी झालेला रिक्षाचालक
  • संतप्त झालेल्या नागरिकांनी टवाळखोरांची दुचाकी फाेडली

जळगाव- कांचननगर परिसरातील उज्ज्वल चौकात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १ वाजता मद्यधुंद टवाळखोरांनी कारण नसताना काही लोकांना मारहाण केली. यात त्यांनी एका रिक्षाचालकावर चॉपरने चार वार करून गंभीर जखमी केले. एका तरुणाच्या डोक्यात दगड मारून पिस्तूल रोखून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. कांचननगरातील एका विशिष्ट ग्रुपच्या सदस्यांनी हा धिंगाणा घातला. या घटनांमुळे परिसरातील त्रस्त, संतप्त नागरिकांनी बुधवारी दुपारी मारहाण करणाऱ्या टवाळखोरांच्या दोन साथीदारांच्या दुचाकी फोडल्या.


दीपक गंगाराम सोनवणे (वय ४०, रा. कांचननगर) यांच्यावर चॉपरने वार केले आहेत. राहुल कांतिलाल सोनवणे याला दगडाने मारून पिस्तूल रोखून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर राहुलला सोडवण्यासाठी आलेल्या प्रतिभा पंुडलिक सपकाळे यांनाही टवाळखोरांनी धक्काबुक्की करून खाली पाडले. आकाश मुरलीधर सपकाळे, गणेश दंगल कोळी व त्यांच्यासोबत दोन जणांनी हा धिंगाणा घातल्याचे जखमी दीपक सोनवणे यांच्या नातेवाइकांनी सांगितले. आकाश, गणेश व इतर दोघांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ३१ डिसेंबरच्या रात्री दीपक सोनवणे व वासुदेव रामकृष्ण सोनवणे हे पार्टी केल्यानंतर रिक्षाने (एमएच १९ व्ही ५५६९) घराकडे येत होते. या वेळी गणेश कोळी याने वासुदेव सोनवणे यांच्या कानशिलात लगावली. सोनवणेंनी विचारणा करताच चौघे मद्यधुंद टवाळखोरांनी रिक्षाचालक दीपक सोनवणेंसह तिघांना बेदम मारहाण सुरू केली. यात आकाशने दीपक यांच्या मांडीवर मागच्या बाजूने चॉपरने चार वार केले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. तत्पूर्वी काही वेळ आधी गणेश कोळी याने पिस्तूल रोखून राहुल सोनवणे याला मारहाण केली होती. या घटनेनंतर जखमी सोनवणे यांच्या नातेवाइकांनी शनिपेठ पोलिस ठाणे गाठले होते. पोलिसांनी रात्री तक्रार घेण्यास नकार दिल्याने बुधवारी सकाळी कांचननगरातील १०० नागरिक शनिपेठ पोलिस ठाण्यात जमले होते. यानंतर पोलिसांनी चारही टवाळखोरांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला.

ग्रुपवर राजकीय वरदहस्त; तक्रार देण्यास आलेल्यांना पाेलिस देतात हाकलून

कांचननगरातील या ग्रुपची संपूर्ण शहरात चर्चा, दहशत वाढत आहे. तीन महिन्यांपूर्वी ग्रुपच्या काही सदस्यांनी वाळूमाफियांना पाठबळ देत गिरणा नदीपात्रात गोळीबार केला होेता. यावेळी तत्कालीन बड्या मंत्र्याने हस्तक्षेप करीत या गुन्हेगारांची पाठराखण केली होती. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली नाही. राजकीय वरदहस्त मिळाल्याने या ग्रुपने पाय पसरले आहेत. दुसरीकडे शनिपेठ पोलिसांकडून या टवाळखोरांवर कारवाई केली जात नाही. त्यांच्या विरुद्ध तक्रार देण्यास आलेल्यांना पोलिस ठाण्यातून हाकलून लावले जाते आहे. मंगळवारी ३१ डिसेंबर असल्यामुळे चौकाचौकात पोलिस बंदोबस्त होता. असे असतानाही कांचननगरातील प्रमुख चौकात पिस्तूल, चॉपर घेऊन दहशत माजवणाऱ्या या चौघांवर पोलिसांची नजर का पडली नाही‌? असा प्रश्न अाहे.