Cricket / गेलची क्रिकेटमधून निवृत्ती; सामन्यात अर्धशतकी धमाका

क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू

दिव्य मराठी

Aug 15,2019 09:40:00 AM IST

पोर्ट ऑफ स्पेन - भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेलने (७२) जोरदार फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी केली. युनिव्हर्सल बॉस गेलने आपल्या अाक्रमक स्टाइलने अर्धशतक ठोकत अांतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मैदानाबाहेर जाताना त्याने आपले हेल्मेट बॅटने उंच करत चाहत्यांना अभिवादन केले. गेल मैदानावर आला तेव्हा भारतीय खेळाडूने त्याला शुभेच्छा दिल्या. पावसाचा अडथळा आल्याने खेळ थांबवला त्या वेळी विंडीजने २२ षटकांत २ बाद १५८ धावा केल्या होत्या. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरा सामना भारताने ६९ धावांनी जिंकला होता.


नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर क्रिस गेलने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ४१ चेडूंत ७२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार व ५ षटकार खेचले. खलील अहमदने कोहलीच्या हाती त्याला झेलबाद केले. दुसरा सलामीवीर लेविसने २९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४३ धावा काढल्या. शाय होपने नाबाद १९ व हेटमायरने नाबाद १८ धावा केल्या. भारताच्या खलील अहमद व यजुवेंद्र चहलने प्रत्येकी १ बळी घेतला.


गेल विशेष
- क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शतक ठोकणारा गेल जगातील पहिला फलंदाज.
- गेल वेस्ट इंडीजकडून वनडेत सर्वाधिक धावा करणारा पहिला खेळाडू.
- गेल क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू आहे. गेलने वनडेत ३३१ षटकार ठोकले.
- कसोटीत ३३३ धावांची सर्वोत्कृष्ट खेळी केली.


क्रिस गेलचे करिअर
गेलने ३०१ वनडे सामन्यात १०,४८० धावा काढल्या. यात वनडेत २५ शतके व ५४ अर्धशतके झळकावली. कसोटीत त्याने १०३ सामन्यात ७२१४ धावा केल्या. त्याने १५ कसोटी शतके आहेत. टी-२० मध्ये २ शतके ठोकली. गोलंदाजीत २५७ बळी घेतले.

X