आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णूर अन्नधान्य घोटाळ्याचा तपास अखेर 'सीआयडी'कडे; दावे-प्रतिदाव्यांमुळे सरकारचाच हस्तक्षेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या कृष्णूर येथील अन्नधान्य घोटाळ्याचा तपास आता गुप्तचर विभागाकडे सोपवण्यात आला आहे. या संबंधाचे आदेश बुधवारी येऊन धडकले. या प्रकरणाचा तपास गुप्तचर विभागाकडे जाणार या संदर्भातले वृत्त दैनिक 'दिव्य मराठी'ने २५ सप्टेंबर राेजीच दिले होते. या वृत्तावर अाता शिक्कामाेर्तब झाले अाहे. 


कृष्णूर येथील इंडिया मेगा कंपनीवर तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी १८ जुलै रोजी धाड घालून सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य घेऊन जाणारे दहा ट्रक पकडले. या प्रकरणाचा तपास प्रारंभी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला. त्यानंतर या तपासाची सूत्रे साहाय्यक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे देण्यात आली. नुरुल हसन यांनी या प्रकरणी अत्यंत बारकाईने तपास करीत तीन ट्रक घोटाळ्याच्या तपासात जवळपास ५०० कोटीच्या अन्नधान्याचा घोटाळा उघडकीला आणला. या घोटाळ्याचे सूत्रधार स्वस्त धान्याचे वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार, त्यांचे भागीदार श्रीनिवास दमकोंडवार, इंडिया मेगाचे मालक अजय बाहेती, व्यवस्थापक जयप्रकाश तापडिया यांच्या विरोधात नुरुल हसन यांनी सबळ पुरावे गोळा केले. यात टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज आणि रजिस्टरमधील नोंदी, जीपीएस प्रणालीतील पुरावे, टीपी पास यांच्यासह शासकीय गोदामात काम करणारे व इंडिया मेगा कंपनीत काम करणारे कर्मचारी, मजूर यांचे जबाब, तेरा ट्रेडिंग कंपन्यांचा या घोटाळ्यातील सहभाग आदी पुराव्याचा समावेश आहे. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती खूप वाढली होती. 


दोन विभाग समोरासमोर 
कृष्णूर घोटाळ्याच्या निमित्ताने राज्य शासनाचे महसूल आणि पोलिस प्रशासन आमने सामने आले होते. या घोटाळ्याबाबत पोलिस प्रशासनाने राज्य शासनाला पाठवलेले अहवाल आणि महसूल प्रशासनाने राज्य शासनाला पाठवलेले अहवाल यात मोठी तफावत होती. दोन्ही प्रशासन आपलीच बाजू योग्य असल्याचे ठासून सांगत होते. त्यामुळे राज्य शासनाचीही अडचण झाली होती. ही सर्व परिस्थिती पाहून अखेर शासनाने या घोटाळ्याचा तपास गुप्तचर विभागाकडे दिला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घोटाळ्याचा गुप्तचर विभागाने सर्वंकष तपास करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे नेते चैतन्यबापू देशमुख यांनी केली. चैतन्यबापू देशमुख यांनी नांदेड मुक्कामी या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या घोटाळ्याची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर या घोटाळ्याची सूत्रे गुप्तचर विभागाकडे सोपवण्यात आली.


नुरुल हसन यांचे कौतुक 
कृष्णूर घोटाळ्याचा तपास अत्यंत बारकाईने केल्याबद्दल राज्याचे पोलिस महासंचालक पडसलगीकर यांनी साहाय्यक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांचे कौतुक केले. या घोटाळ्याबाबत त्यांना प्रशस्तिपत्र देऊन महासंचालकांनी त्यांना शाबासकीही दिली. 


आरोपी अद्यापही फरारच 
१८ जुलैला धाड पडल्यानंतर या घोटाळ्याचे सूत्रधार राजू पारसेवार, अजय बाहेती, श्रीनिवास दमकोंडवार, जयप्रकाश तापडिया आदी फरार झाले. ते अद्यापही फरारच असून त्यांचा पोलिसांना काही ठावठिकाणा लागला नाही. या आरोपींपैकी राजू पारसेवार यांनी एकदा तर जयप्रकाश तापडिया यांनी दोन वेळा बिलोली सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. तथापि न्यायालयाने त्यांचा जामिन मंजूर करण्यास नकार दिला. नुरुल हसन यांनी या घोटाळ्याचा संपूर्ण तपास पूर्ण केला व आता दोषारोप पत्र दाखल करण्याचे काम शिल्लक असताना या प्रकरणाचा तपास गुप्तचर विभागाकडे सोपवण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...