आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीएसटी घटवल्याने सिनेमाची तिकिटे 6 ते 30 रुपयांपर्यंत स्वस्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून औरंगाबादसह देशभरातील सिनेप्रेक्षकांना सरकारकडून अनोखी भेट मिळाली आहे. मल्टिप्लेक्सच्या तिकिटांवरील जीएसटीमध्येे कपात करण्याच्या निर्णयामुळे आजपासून तिकिटाचे दर ३० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. याचा थेट फायदा प्रेक्षकांना होत असून आता तिकिटाप्रमाणेच खाद्यपदार्थांचेही दर कमी करण्याची मागणी होत आहे. 

 

जीएसटी कौन्सिलच्या २२ डिसेंबर राेजी झालेल्या बैठकीत २३ वस्तूंवरील जीएसटीत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात मल्टिप्लेक्समधील चित्रपटांच्या तिकिटाचाही समावेश होता. १ जानेवारी २०१९ पासून नवीन दर अमलात येणार होते. आतापर्यंत १०० रुपयांपर्यंतच्या तिकिटावर १८ टक्के जीएसटी लागत होता. आता हे दर १२ टक्के करण्यात आले आहेत. म्हणजेच या श्रेणीत ६ टक्क्यांची बचत होणार आहे, तर १०० रुपयांवरील तिकिटासाठी लागणारा २८ टक्के जीएसटी आता १८ टक्क्यांवर आला आहे. यामुळे महागड्या तिकिटांच्या दरात आता १० टक्के बचत होणार आहे. नवीन नियमानुसार १ जानेवारीपासून तिकिटांच्या दरात बदल झाले. 

 

महागड्या तिकिटांवर जास्त बचत 
नवीन दराप्रमाणे १०० रुपयांचे तिकीट जीएसटीसह ११८ रुपयांऐवजी आता ११२ रुपयांत मिळेल. यावर ६ रुपयांची बचत होईल. १५० रुपयांचे तिकीट १९२ ऐवजी १७७ रुपयांत म्हणजेच १५ रुपये स्वस्त मिळेल, तर २०० रुपयांच्या तिकिटावर २० रुपयांची बचत होईल. हे तिकीट २५६ ऐवजी २३६ रुपयांत मिळेल. तर ३०० रुपयांचे तिकीट ३८४ ऐवजी ३५४ रुपयांत म्हणजेच ३० रुपयांनी स्वस्त मिळेल. 

 

६ ते १०% कपात 
मल्टिप्लेक्सच्या तिकीट दरात ६ आणि १० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. यामुळे तिकिटाचे दर ३० रुपयांपर्यंत कमी होतील. - रोहन आचलिया, सीए 

 

अजून दर कमी व्हावेत 
तिकिटाचे दर कमी झाले, पण अजून कमी व्हावेत. शिवाय मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थांसाठी तिकिटापेक्षा मोठी रक्कम मोजावी लागते. तीसुद्धा कमी व्हावी. - कुणाल पाटील, प्रेक्षक 

 

आता प्रेक्षकांचा फायदा होईल 
जीएसटीत बदल झाल्याने आजपासूनच नवीन दराप्रमाणे तिकीट विक्री सुरू केली आहे. दर कमी झाल्याने प्रेक्षकांना फायदा होईल. - नितीन सोनवणे, व्यवस्थापक, अंजली कार्निव्हल बिग सिनेमा