आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीआयएसएफ अधिकाऱ्यांच्या दहा दुचाकींसह एक चारचाकी जाळली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- नेहरूनगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयसीएफ) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पार्किंगमधील दहा दुचाकी व एक चारचाकी वाहने अज्ञात समाजकंटकांनी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रकार बुधवारी (दि. २) पहाटे साडेतीन ते साडेचार वाजेच्या सुमारास घडला आहे. विशेष म्हणजे उपनगर पोलिस ठाणे अवघ्या हाकेच्या अंतरावर असूनही हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये पोलिसांच्या कामगिरीबाबत संशय निर्माण केला जात आहे. सीआयएसएफच्या अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचा संशय उपनगर पोलिसांना असून त्याबाबत ते तपास करीत आहेत. 

 

चलार्थ पत्र मुद्रणालय आणि भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या सुरक्षेसाठी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. अनेक प्रेस कर्मचारी निवृत्त झाल्यामुळे नेहरूनगर वसाहत भकास झाली होती. मात्र, सीआयएसएफचे जवान आणि अधिकारी या ठिकाणी वास्तव्यास आल्यापासून हा परिसर पुन्हा गजबजला आहे. चार महिन्यांपूर्वीही अधिकाऱ्यांचे शासकीय चारचाकी वाहन जाळण्यात आले होते. तो प्रकार ताजा असतानाच बुधवारी पहाटे सीआयएसएफच्या तीन शासकीय दुचाकी, कर्मचाऱ्यांच्या सहा दुचाकींसह एक चारचाकी वाहन जाळण्यात आले. 

विशेष म्हणजे, एकाच परिसरात तीन ठिकाणी वाहनांना आग लावण्यात आली. वाहने जळत असताना काही कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी त्वरित पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच, पोलिसांनाही याबाबत माहिती दिली. एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. त्यामुळे त्या दुचाकीचा क्रमांकही मिळाला नाही. याबाबत दलाचे हवालदार संजयकुमार बनसोडे यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

चार वीज मीटर वितळले 
पहिल्या मजल्यापर्यंत ज्वाला गेल्याने भिंत काळी झाली आहे. चार वीज मीटर पूर्णपणे वितळून गेले आहेत. वॅगन आरचा आतील भाग संपूर्ण जळाला आहे. त्यामुळे परिसरातील कर्मचाऱ्यांचे कुटुंब दहशतीच्या छायेत आहे. 

 

थंडीच्या कडाक्यामुळे साधली पहाटेची वेळ 
गत आठवड्यापासून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. बुधवारी पहाटेच्या वारे प्रति ताशी २ ते ३ किलोमीटर वेगाने वाहत असल्याने आणि किमान तपमान ७ अंश सेल्सिअसवर असल्याने थंडीचा कडाका वाढलेला होता. सध्या थंडीमुळे लवकर आणि सकाळी उशिरापर्यंत शांतता असते. बुधवारी पहाटे याच थंडीच्या कडाक्यामुळे समाजकंटकांनी पहाटेची वेळ साधली असावी. वाहने जाळल्याच्या ठिकाणापासून उपनगर पोलिस ठाणे अवघ्या दीडशे फुटांवर आहे. पोलिस ठाण्याच्या परिसरात असे प्रकार समाजकंटक करीत असतील तर दूरवर असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

 

अशी आहेत जळीत वाहने :

स्प्लेंडर एमएच. १५ एए ८०१२, स्प्लेंडर एमएच १५ एए ८०१४, स्प्लेंडर एमएच १५ एए ८०१६, बजाज डिस्कव्हर ओआर ०५. एएल ७४३९, बजाज प्लॅटिना जेएच ०५ एएफ ९८४७, सीबीझेड एमपी ४१ एमएस ८००६, राॅयल इनफिल्ड एमएच १५ जीजी ०५८०, स्कूटर एपी ३१ एल २४०५, वॅगन अार एएस १४८४, तर एक नवीन टीव्हीएस पूर्णतः जाळून खाक झाली. 

 

पोलिसांनी माध्यमांपासून लपवली वाहने 
नाशिक शहरात वाहने जाळण्याचा प्रकार तसा नवा नाही. मात्र, एकाच वेळी दहा दुचाकी जाळण्यात आल्याने हा गंभीर प्रकार वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण नाशिकरोड परिसरात पसरला. माध्यमांचे प्रतिनिधीही जळीत वाहनांचे फोटो काढण्यासाठी गेले असताना उपनगर पोलिस ठाण्यातील अधिकारी वाहने नाशिकला पाठविण्यात आल्याचे सांगत होते. मात्र, गुन्हे शाखेच्या रूमच्या मागे जाळण्यात आलेल्या दुचाकी कापड टाकून झाकल्या होत्या. माध्यमांपासून ही बाब पोलिस का लपवित होते याचे कारण समजले नाही. 

 

फाॅरेन्सिक अहवालावरून ठरणार दिशा 
दुचाकी आणि चारचाकी या नेमक्या कोणत्या पदार्थाने जाळण्यात आल्या याचा शोध पोलिस घेत असून त्या ठिकाणी तपासासाठी काही पुरावा मिळतो का याचाही शोध पोलिसांनी घेतला. फाॅरेन्सिक लॅबचे अधिकारी त्या ठिकाणी असलेल्या वस्तू तपासुन घेत होते. लॅबच्या अहवालावरून पोलिसांना तपासासाठी दिशा मिळणार आहे. 

 

अंतर्गत कुरबुरी तपासणार 
घटनेच्या तपासाचा वेग वाढविला आहे. सीआयएसएफच्या अंतर्गत काही कुरबुरी आहेत का हेदेखील तपासून पहावे लागणार आहे. - ईश्वर वसावे, सहायक पोलिस आयुक्त 

 

संशयितांवर लक्ष केंद्रित 
वाहने का व कोणी जाळली, याबाबत तपास सुरू केला आहे. काही संशयितांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल. - प्रभाकर रायते, पोलिस निरीक्षक