आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमायतनगर स्थानकावर प्लॅटफाॅर्मचे निकृष्ट दर्जाचे काम, नागरिकांची तक्रार

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नांदेड - २० वर्षांनंतर हिमायतनगर रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मचे काम दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी भेट दिल्यानंतर हाती घेण्यात आले. हे काम  हाय लेव्हल प्लॅटफॉर्म दर्जाचे असताना देखील संबंधित ठेकेदाराकडून थातूरमातूर करण्याचा सपाटा लावण्यात आला. त्यामुळे शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी या कामावर भेट देऊन सुमार दर्जाचे काम होत असल्याची तक्रार रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा आणि आय ओ डब्ल्यू मीना यांच्याकडे केली. मागील काही वर्षांपासून हिमायतनगर येथील रेल्वे स्थानक सुविधेच्या गर्तेेत सापडले आहे. स्थानकावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवासी वर्गासह वृद्ध आणि महिला, मुलींना याचा फटका सहन करावा लागत आहे. या मार्गाचे रुंदीकरण झाल्यानंतर सर्व सुविधा उपलब्ध होतील अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल गेल्याने मोठ्या कठीण परिस्थितीत प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर अाली. धार्मिक स्थळाकडे जाणाऱ्या भाविक भक्त, गोर-गरीब नागरिक, प्रवासी व्यापारी वर्गांना ठिकाण गाठण्यासाठी अनेक रेल्वे बदलाव्या लागत आहेत. तसेच महत्त्वाच्या धनबाद - कोल्हापूर गाडीला हिमायतनगर रेल्वे स्थानकावर थांबा नाही, स्थानकावरील अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य, पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा अनेक समस्यांनी प्रवासी वर्ग त्रस्त आहे. गतवर्षी हिमायतनगर रेल्वे स्थानकाला सिकंदराबादचे महाव्यवस्थापक यांनी दिलेल्या भेटीत रेल्वे संघर्ष समिती, पत्रकार संघटनेने विविध मागणीचे निवेदन दिले. ते विचारात घेऊन सदरचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु संबंधित ठेकेदाराकडून हाय लेव्हल प्लॅटफार्म काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. आजघडीला येथील सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून, अगोदरचे काँक्रिटीकरणाचे काम जीसीबीने काढले. त्यावर दबाई न करताच काँक्रिटीकरण केले जात आहे. पाठीमागील साइडवर तर थेट माती मिश्रित मुरूम टाकून सिमेंट काँक्रीट करून रेल्वे महाव्यवस्थापक गजानन माल्या, नांदेड डिव्हिजन रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा आणि शासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे  काम केले जात आहे. दि.१३ रोजी रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आढावा घेण्यासाठी येणार आहेत, यामुळे हाय लेव्हल प्लॅटफॉर्मचे काम अत्यंत जलद गतीने करण्यात येत आहे.

केवळ एक खासगी अभियंता लावून काही मिस्त्रींच्या हस्ते काम
 
गावातील फुले, शाहू, आंबेडकर संघटनेचे सुभाष दारवंडे, असद मौलाना, प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी बलपेलवाड, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, शहराध्यक्ष खंडू चव्हाण आदींनी रेल्वे स्थानकांच्या कामावर भेट देऊन विचारपूस केली. या वेळी येथे एकही सेक्शन इंजिनिअर उपस्थित नव्हता. केवळ एक खासगी अभियंता लावून हिमायतनगर येथील काही मिस्त्रीच्या हस्ते हे काम होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदरचे होत असलेले निकृष्ट काम थांबवण्यात यावे, अशी मागणी वरिष्ठांना करण्यात आली. या वेळी आय ओ डब्ल्यू मीना म्हणाले की, माझ्याकडे अगोदरच तक्रार आली आहे. सदर ठेकेदाराला काम थांबविण्याचे मी आदेश दिलेले आहे. प्रत्यक्ष कामाची पाहणी करून पुढील काम होईल, असे त्यांनी सांगितले.