आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणातून धार्मिक प्रश्न निर्माण होत असतील तर समजून घ्या सत्ता चुकीच्या हातांमध्ये आहे!

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

मुंबई - राजकारणात धार्मिक प्रश्न निर्माण होत असतील तर समजून घ्यावे सत्ता चुकीच्या हातांमध्ये आहे! अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते संजय राउत यांनी सरकारवर टीका केली. नागरिकत्व कायद्यावरून देशभर आंदोलने सुरू असताना केंद्र सरकारवर टीका करताना राउत यांनी जगप्रसिद्ध अमेरिकन विचारवंत मार्टिन ल्युथर किंग यांचे वाक्य कोट केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय बदलानंतर भाजप आणि शिवसेनेत काडीमोड झाला, तेव्हापासूनच राज्यसभा खासदार संजय राउत भाजपवर एकानंतर एक टीकास्त्र सोडत आहेत.

विरोधी पक्षांचा विरोध झुगारून लावताना सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2019 मंजूर करून घेतले. यानंतर त्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि कायद्यात रुपांतर झाले. अद्याप हा कायदा लागू करण्यात आलेला नाही. या कायद्यानुसार, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश या मुस्लिम देशातील मुस्लिम वगळता इतर धर्माच्या नागरिकांना भारताचे नागरिकत्व दिले जाणार आहे. यासाठी त्यांना कागदपत्रांची सुद्धा गरज नाही. 2014 पूर्वी भारतात आश्रय घेण्यासाठी आलेले या तीन देशांतील सर्वच लोक भारताचे नागरिक मानले जातील. परंतु, आंदोलक या कायद्याचा थेट एनआरसीशी संबंध असल्याचे आरोप करत आहेत. त्यांच्या मते, एनआरसीमध्ये लाखो लोकांना भारतातून हकलण्याची तयारी सुरू आहे. यात जे मुस्लिम नसतील त्यांनाच नागरिकत्व कायद्यातील तरतूदी लागू करून भारतात ठेवले जातील. हा मुस्लिमांवरील अन्याय आणि भारतीय राज्यघटनेच्या विरोधात आहे असाही आरोप केला जात आहे.