आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर बँकेच्या संचालकांना अटक नाही; सर्वसाधारण सभा शांततेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून नावे असलेल्या शहर सहकारी बँकेच्या संचालकांना तूर्तास अटक होणार नसल्याचे संकेत पोलिसांकडून मिळाले आहेत. तपासादरम्यान चौकशीसाठी आवश्यक असलेले कागदपत्र सादर करण्यासाठी बोलावू तेव्हा हजर होण्याच्या नोटिसा संचालकांना बजावण्यात आल्या आहेत. त्यास संचालकांनी होकार दिला असल्याने त्यांच्यावरील अटकेची कारवाई तूर्तास टळली आहे. 


एम्स हॉस्पिटलचा प्रवर्तक डॉ. नीलेश शेळके याच्यासह नगर शहर बँकेच्या संचालकांवर सुमारे १७ कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. शेळके याचे भागीदार असलेल्या तीन डॉक्टरांनी ही फिर्याद दिली. दरम्यान, सर्व कर्ज नियमानुसारच दिले असल्याचा दावा शहर बँकेने केला. डॉ. रोहिणी भास्कर सिनारे, डॉ. उज्ज्वला रवींद्र कवडे व डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात स्वतंत्र फिर्यादी दाखल केल्या आहेत. शुक्रवारी सकाळी अार्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी तपासाला वेग दिला. आरोपी असलेल्या बँकेच्या संचालकांना तपासाकरिता हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या. त्याला अनेकांनी होकार दर्शवला. दरम्यान, शुक्रवारी दुपारी बँकेतील अधिकारी व वकिलाच्या शिष्टमंडळाने एसपींची भेट घेतली. 


फरार नसल्याचे गुंदेचा यांचे स्पष्टीकरण 
कर्जप्रकरणामुळे चर्चेत आलेल्या शहर सहकारी बँकेची सभा शुक्रवारी शांततेत झाली. समजूतदार सभासद व ठेवीदारांनी चांगली भूमिका घेऊन खोटारड्यांना खोटे पाडण्याचा प्रयत्न केला. मी कुठेही फरार नव्हतो, नगरमध्येच होतो, असेही बँकेचे चेअरमन सुभाष गुंदेचा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 


शहर सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली, यावेळी संचालक सुभाष भंडारी, संजय घुले, सुजित बेडेकर, अशोक कानडे, शिवाजी कदम, गिरीष घैसास, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अनासपुरे, डी.एम. कांबळे, अशोक बाबर, प्रा. माणिक विधाते, एस. डी. बांदल, उबेद शेख आदी उपस्थित होते. सभासदांनी यावेळी बँकेची भूमिका मान्य करून बँकेच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. यानंतर पत्रकारांशी बोलताना गुंदेचा म्हणाले, कर्ज घेतलेच नाही, अशी कर्जदारांची भूमिका मान्य नाही. केवळ बँकेच्या मिटिंगमध्ये गडबड होऊन चांगल्या संस्थेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न केला आहे. पण, समजूतदार सभासद व ठेवीदारांनी चांगली भूमिका घेऊन खोटारड्यांना खोटे पाडण्याचा प्रयत्न केला. बैठकीला पंधरापैकी अकरा संचालक उपस्थित होते. संचालक मंडळातील कोणीही फरार नव्हते, मी काल गोपाळ मिरीकर कार्यक्रमात उपस्थित होतो. मी म्हणेल अटक करू द्या खरे, खोटे समोर येईल, मी स्वत: अटक होण्यास तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


घैसास म्हणाले, वृत्तपत्रात जरी बातम्या येत असल्या तरी खातेदार व ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, बँकेची स्थिती भक्कम आहे. शहर सहकारी बँकेेने पाच कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, कायदेशीर प्रक्रिया करूनच कर्ज दिले आहेत, असे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...