आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअय्युब कादरी
अहमदनगर - अहमदनगरच्या नेत्यांची नावे जरी पाहिली तरी बाहेरच्या लोकांना वाटेल की या मोठ्या नेत्यांप्रमाणेच शहर भव्य-दिव्य, विकसित असेल… पण ठराविक भागाचा अपवाद वगळता शहरात फिरले खरी परिस्थिती कळते. विकासाचा अनुशेष खूप असला तरी हे मुद्दे कधीच निवडणुकीचे झालेच नाही, तसे ते या वेळीही होणार नाहीत, असे चित्र आहे. गेल्या वेळी युती तुटल्याने मतविभाजन झाले. यामुळे निसटता पराभव झालेले शिवसेनेचे अनिल राठोड हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी दोन हात करण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत.
हिंदू-मुस्लिम मुद्दा, समाजाला संरक्षण या भावनिक मुद्द्यांवर येथील निवडणूक अनेक वर्षे लढवली जातेय. २०१४ मध्ये शिवसेनेचे अनिल राठोड (४६०६१) व भाजपचे अभय आगरकर (३९९१३) यांच्यात मतविभागणी झाल्याने राष्ट्रवादीचे संग्राम जगताप (४९३७८) विजयी झाले. आता संग्राम जगतापच भाजपत जातील, अशी चर्चा हाेती. मात्र त्याला पूर्णविराम मिळालाय. त्यामुळे पुन्हा जगताप व राठाेड यांच्यातच लढत हाेण्याची चिन्हे अाहेत.
‘नगरचा नागरिक मात्र उदासीन दिसून आला. सलग २५ वर्षे एकाला निवडून दिले, त्यांनी काहीही केले नाही. गेल्यावेळी बदल केला, पण पाटी कोरीच’, अशी प्रतिक्रिया मतदारांची अाहे. या निवडणुकीत काय करणार, या प्रश्नाचे उत्तर मात्र ते टाळतात. नेत्यांनी आपली, मुलांची, नातवांची सोय करून घेतली. त्यासाठी पक्षांतरे केली, मात्र विकासाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. शहरात चारमजली कपड्यांची दालने आहेत, मात्र समोर दुचाकी उभी करायलाही नाही, यावरून परिस्थिती लक्षात यावी.
असे आहेत प्रमुख प्रतिस्पर्धी
> आमदार संग्राम जगताप
यंत्रणा प्रभावी, संघटनही मजबूत आहे. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संबंध स्नेहपूर्ण आहेत. केडगाव दुहेरी हत्याकांडात नाव अाले, तुरुंगात गेल्याने प्रतिमा मलिन. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा फटका.
> अनिल राठोड
या मतदारसंघाचे २५ वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. हिंदू-मुस्लिम मुद्दा घेऊन निवडणूक लढवली. सर्वसामान्यांसाठी तत्काळ उपलब्ध होणारे, अशी प्रतिमा. २०१४ मध्ये जगताप यांच्याकडून पराभव. कदाचित यंदा शेवटची संधी.
रस्ते आणि विकासाचा संबंध?
१०-१२ वर्षांपूर्वी शहर सुधार समितीच्या शिष्टमंडळाने प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन आमदारांची भेट घेऊन रस्ते दुुरुस्ती, रुंदीकरणाची मागणी केली होती. ‘रस्ते आणि विकासाचा काय संबंध?’, या तत्कालीन आमदारांनी केलेला प्रश्न ऐकून २२ वर्षे प्राचार्य राहिलेले, अर्थशास्त्राचे अभ्यासक शितोळे थक्क झाले असतील. तर मुद्दा असा की, नेत्यांना व्हिजन नसल्यामुळे शहराचा विकास नाही, उद्योग नाहीत. त्यामुळे राेजगारही नाही.
नागरिकांनी ही परिस्थिती स्वत: ओढवून घेतलीय
नेत्यांसह नागरिक, व्यापारीही उदासीन आहेत. अन्यथा विकासाची दृष्टी असलेले माजी आमदार नवनीतभाई बार्शीकर यांचा पराभव झाला असता का? रस्त्यांचे रुंदीकरण, अतिक्रमण काढण्यासाठी नवनीतभाई यांनी पुढाकार घेतला होता, पण त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. नगरच्या नेत्यांना शहराविषयी ममत्व नाही. शहरातील नागरिकांनी ही परिस्थिती स्वत:हून ओढवून घेतली आहे.
- आनंद शितोळे, सामाजिक अभ्यासक, नगर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.