Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | City: vegetable import decreases in nagar city

नगर: शहरात फळभाज्यांची आवक मंदावली; पालेभाज्या मात्र स्वस्त

प्रतिनिधी | Update - Aug 23, 2018, 05:03 AM IST

जिल्ह्यात पावसात खंड पडल्याने खरिपातील फळभाज्याचे उत्पादन घटले

 • City: vegetable import decreases in nagar city
  नगर - जिल्ह्यात अडीच महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने भाजीपाल्याचे उत्पादन निम्म्याने घटले असून, बाजारात आवकही मंदावली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव काहीसे कडाडले आहेत. भाजीपाला मात्र स्वस्त दराने विकला जात आहे. सध्या कोंथबिर, मेथी, शेपू, पालक हा भाजीपाला सर्वसामान्य नागरिकांच्या अवाक्यात आहेत.

  नगर जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन दिवस पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. जून महिन्यात झालेल्या तुरळक पावसामुळे खरिपाच्या अवघ्या २५ टक्केच पेरण्या झाल्या होत्या. जुलै महिन्यात पावसाची अपेक्षा होती. मात्र, जुलै महिन्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे खरिपाच्या ५० टक्के देखील पेरण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. ऑगस्ट महिन्यातील बहुतेक दिवस कोरडे गेल्यानंतर १६ व १७ ऑगस्टला पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पुन्हा पाऊस थांबला होता. जिल्ह्यात आतापर्यंत ८५ टक्क्यांच्या पुढे पेरण्या झाल्या असल्या, तरी बहुतेक भागात पावसाअभावी पिके जळण्याच्या मार्गावर होते. खरीप हंगाम धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. पावसाअभावी खरिपाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. बाजारात कमी प्रमाणात भाजीपाला येत असल्याने भाव मात्र कडाडले आहेत. उन्हाळ्यात भाजीपाल्याचे भाव स्थिर असताना पावसाळ्यात मात्र भाव कडाडले आहेत. नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज १ हजार क्विंटल भाजीपाल्याची, तर ५०० क्विंटल फळभाज्याची आवक होती. प्रामुख्याने या बाजार समितीत हॉटेल व्यावसायिक तसेच घरगुती ग्राहक मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळभाज्या खरेदी करतात. त्याचबरोबर याच बाजार समितीतून दररोज मुंबई व पुण्यातही भाजीपाला विक्रीसाठी जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या बाजार समितीत फळभाज्या व भाजीपाल्याची आवक घटल्याने मुंबई-पुण्याकडेही या बाजार समितीतून फळभाज्या व भाजीपाला विक्रीसाठी जात नाही. सध्या नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोंथिबिरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या किरकोळ बाजारात पाच रुपये जुडी या दराने कोंथिबिरीची विक्री होत आहे. मेथीची आवक कमी असली तरी भाव मात्र स्थिर आहेत. मेथी १० ते १५ रुपये दराने विकली जात आहे. पालक १० ते १५ रुपये जुडी, शेपू १० रुपये जुडी, तांदुळजा १० रुपये जुडी,करडई १० रुपये जुडी अशा भावाने भाजीपाल्याची विक्री होत आहे. भाजीपाला स्वस्त असताना फळभाज्या महागल्या आहेत. कारल्याची ३० ते ४० रुपये किलो या दराने विक्री होत आहे. हिरवी मिरची प्रतिकिलो ६० रुपये, वांगी ३५ ते ४० रुपये, बटाटे १५ ते २५ रुपये, टोमॅटो १५ ते २० रुपये, भेंडी ४० रुपये प्रतिकिलो, दोडके ४० रुपये, भोपळा १० ते १५ रुपये किलो, शेवगा शेंग ३० ते ८० रुपये किलो, लिंबू २० ते ३० रुपये, कोबी २० ते ३० रुपये किलो, फ्लाॅवर ३० ते ४० रुपये किलो, काकडी ३० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे.


  डाळिंब ५० रुपये किलोवर
  श्रावण महिना सुरू झाल्याने फळांना मागणी वाढली आहे. यंदा फळे स्वस्त आहे. सफरचंद १०० ते २०० रुपये किलो, खरबूज ६० ते ८० रुपये किलो, डाळिंब २० ते ४० रुपये किलो दराने या फळांची विक्री होत आहे. सीताफळे, मोसंबी ही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असून, सीताफळे ३० ते ४० रुपये किलो, तर मोसंबीची ४० ते ७० रुपये दराने विक्री होत आहे.

  कांदा सर्वसामान्यांच्या अवाक्यात
  फळभाज्या व भाजीपाल्याची आवक घटली असली, तरी कांद्याची आवक मात्र वाढत आहे. किरकोळ बाजारात २० ते ३० रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. कांद्याचे उत्पादन वाढल्यामुळेच गेल्या सहा महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव कोसळले होते. त्यानंतर कांद्याचे भाव स्थिर आहेत. मागील दोन दिवसांत दमदार पावसामुळे मात्र फळभाज्यांची आवक घटली.

Trending