आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर बससेवेचा ठराव अजून आयुक्तांपर्यंत पोहोचलाच नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहर बससेवेसाठी दीपाली ट्रान्स्पोर्ट संस्थेची निविदा मंजूर करताना २०१८ मधील नवीन बसगाड्या असतील, तरच नुकसान भरपाईचे अनुदान देण्याचा निर्णय स्थायी समिती सभेत शनिवारी (४ ऑगस्ट) घेण्यात आला होता. बारा दिवस उलटूनही पुढील कार्यवाहीसाठी हा ठराव अजूनही प्रशासकीय यंत्रणेसह आयुक्तांपर्यंत पोहोचलेला नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे शहर बससेवा सुरू होण्यास आणखी किती दिवस वाट पहावी लागणार असा प्रश्न नगरकरांना पडला आहे. 


महापालिकेच्या स्थायी समितीची सभा ४ ऑगस्टला सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. यापूर्वी बससेवा देणाऱ्या यशवंत ऑटोची बससेवा बंद झाल्यानंतर नव्याने १७ एप्रिलला निविदा मागवण्यात आल्या होत्या. बसगाड्या मोडकळीस आल्या असल्याने तत्कालीन स्थायी समितीने नविन निविदा काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानुसार दीपाली ट्रान्सपोर्ट २ हजार २५, गाडे ट्रान्सपोर्ट १ हजार ५२५ तर वाही ट्रान्स्पोर्ट कंपनीने १ हजार ३३६ रुपये दरमहा प्रतिबस याप्रमाणे स्वामित्वधन देण्याची तयारी दर्शवली होती. त्यात सर्वाधिक २ हजार २५ रुपये स्वामित्वधन देणाऱ्या दीपाली ट्रान्सपोर्टबरोबर ८ जूनला वाटाघाटी होऊन स्वामित्वधन २ हजार २०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले. हा विषय स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. त्याला मंजुरी देताना सभापती वाकळे यांनी नवीन बस व चांगली सेवा द्यावी, जुन्या बसला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नका, असे स्पष्ट आदेश देऊन ठरावाला मंजुरी दिली. 


मोठ्या प्रतीक्षेनंतर शहर बससेवेचा विषय मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर पोहोचला होता. ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतरही आता पुढील कार्यवाहीसाठी दिरंगाई केली जात आहे. ठराव झाल्यानंतर त्याचे इतिवृत्त किंवा ठराव अधिकृत करून त्यावर सूचक, अनुमोदकांसह सभापतींच्याही स्वाक्षरी आवश्यक आहेत. हा ठराव अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणांसह आयुक्तांकडे पाठवणे अपेक्षित आहे. तथापि, आजतागायत हा ठराव प्रशासकीय यंत्रणेकडे अंमलबजावणी पाठवला नसल्याचे समोर आले. शहर बससेवा नसल्याने नगरकरांना खासगी प्रवासी साधनांद्वारे प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थी, तसेच नोकरदार वर्गालाही खासगी वाहनांतून प्रवास करण्यासाठी शहर बससेवेच्या तुलनेत जास्तीचे भाडे द्यावे लागत आहेत. त्यामुळे तातडीने पुन्हा एकदा शहर बससेवा सुरू व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 


माझी स्वाक्षरी झाली... 
शहर बससेवेबाबत स्थायी समितीत ठराव घेतला आहे. या ठरावावर माझी स्वाक्षरी करून मी पुढे पाठवला आहे. सूचक, अनुमोदक यांच्या स्वाक्षरीसह पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी. शहरात शहर बससेवा सुरू करण्यासाठी नियमानुसार अंमलबजावणी करावी.
- बाबासाहेब वाकळे, सभापती, स्थायी समिती. 


ठराव झाला, पण... 
शहर बससेवेबाबतचा ठराव झाला अाहे, पण तो आमच्यापर्यंत पोहोचला नाही. सभेत मंजूर झालेला ठराव अंमलबजावण्यासाठी आयुक्तांसमोर ठेवला जातो. त्यानंतर आयुक्तांची मान्यता आल्यानंतर ठेकेदाराला अनामत रक्कम भरण्याचे पत्र देऊन करार केला जातो. नंतर ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिले जातात.
-  परिमल निकम, यंत्र अभियंता. 

बातम्या आणखी आहेत...