Home | Maharashtra | Mumbai | Claims for BJP on 'Chief Minister' Girish Mahajan took a secret meeting with Uddhav Thackeray

‘मुख्यमंत्रिपदा’वर भाजपसाठी दावा; महाजनांची उद्धव यांच्याकडे दिलगिरी, शिवालयात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतली गुपचूप भेट

विशेष प्रतिनिधी, | Update - Jun 25, 2019, 09:48 AM IST

युती अभेद्यच : उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस

 • Claims for BJP on 'Chief Minister' Girish Mahajan took a secret meeting with Uddhav Thackeray

  मुंबई - ‘मुख्यमंत्री आमचाच होणार,’ असे दावे भाजपकडून सुरू असल्याने युतीतील वातावरण तणावपूर्ण झाले होते. या पार्श्वभूमीवर विधान भवनात सोमवारी शिवसेना आणि भाजपची संयुक्त बैठक पार पडली. यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत सेना कार्यालयात गुपचूप भेट घेतली. यात महाजनांनी मुख्यमंत्रिपदासंदर्भातील वक्तव्यामुळे उद््भवलेल्या वादाबद्दल उद्धव यांची दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


  युतीची विधान भवनातील बैठक संपल्यावर गिरीश महाजन यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी चक्क खिशातला रूमाल काढून थेट तोंडात कोंबला आणि काहीच बोलणार नाही असे खूणवले. विधान भवनातील युतीच्या संयुक्त बैठकीने विरोधकांबरोबरच पक्षाअंतर्गतही युतीत मिठाचा खडा टाकणाऱ्यांचे कान चांगलेच टोचले गेलेत, हाच इशारा या बैठकीतून देण्यात आल्याचं बोलले जात आहे.

  युती अभेद्यच : उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस

  युती अभेद्यच असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सांगत आमदारांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच यापुढे मुख्यमंत्रिपद वा जागा वाटपाबाबत अमित शाह, उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीसच अधिकृत प्रतिक्रिया देतील. अन्य कोणीही याबाबत माध्यमांशी बोलू नये, असा आदेशही आमदार व नेत्यांना देण्यात आला.


  मुख्यमंत्रीपदावरून युतीत तेढ निर्माण झाल्याचे चित्र होते. शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमात नेते नेरूरकर यांनी युती तुटू शकेल; त्यामुळे २८८ जागांची तयारी केली पाहिजे, असे म्हटले होते. मात्र याच कार्यक्रमात फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी युती भक्कम असल्याचे म्हटले होते. आता आमदारांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

  काय म्हणाले मुख्यमंत्री

  सोमवारी संध्याकाळी विधिमंडळात सेना-भाजप आमदारांची बैठक झाली. यात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. फडणवीस म्हणाले, लोकसभेला ज्याप्रमाणे आपण काम केले तसेच काम विधानसभेसाठीही करायचे आहे. मनात कोणतीही शंका न आणता दोघांनी मिळून काम केले पाहिजे. मुख्यमंत्रीपदाबाबत कोणीही माध्यमांशी बोलू नये. योग्य वेळी निर्णय जाहीर केले जातील.

  काय म्हणाले उद्धव ठाकरे

  उद्धव ठाकरे म्हणाले, दोन्ही पक्षांच्या आमदारांनी एकमेकांना मदत करून काम करण्याची आवश्यकता आहे. युतीबाबत येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष देऊ नये. युती भक्कम आहे. मुख्यमंत्रीपद वा अन्य गोष्टींबाबत भाजप अध्यक्ष अमित शाह, मी आणि मुख्यमंत्री निर्णय घेऊ. आमची चर्चाही झाली आहे. त्यामुळे त्या विषयावर अन्य कोणी काही बोलू नये. तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करू नये.

  ... तर पक्षाकडून शिस्तभंगाई कारवाई करण्यात येणार

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापुढे युती वा मुख्यमंत्रिपदाबाबत एखाद्या नेत्याने काही प्रतिक्रिया दिली आणि गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अमित शाह आणि उद्धव ठाकरेंनी आपापल्या पक्षाच्या नेत्यांना दिला आहे. या बैठकीतही माध्यमांशी कोणीही या विषयावर बोलू नये, असा इशारा पुन्हा एकदा आमदार आणि मंत्र्यांना देण्यात आला.

Trending