आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष: यंदा बारावीच्या प्रश्नपत्रिकेत पर्याय प्रश्न, उपप्रश्न वगळणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या २१ फेब्रुवारीपासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेला सुरुवात होत असून या वर्षापासून प्रश्नपत्रिकांचे स्वरुप राष्ट्रीयस्तरावरील प्रवेश परीक्षांना समोर ठेवून बदलले अाहेत. यात आता पाठ्यपुस्तकातील प्रत्येक धड्यावर आधारित प्रश्नांची विचारणा करण्यात येईल. 


मागील वर्षी अकरावीच्या परीक्षेत हा बदल केला गेला. वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट), इंजिनिअरिंग, आयआयटी प्रवेश पूर्व परीक्षा (जेईई मेन) तसेच सीबीएसई व अन्य बोर्डांच्या तुलनेत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अडचणी येत असतात. कौन्सिल ऑफ बोर्डस ऑफ स्कुल एज्युकेशन इन इंडियातर्फे देशातील अकरावी व बारावीसाठी फिजिक्स,केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स या विषयांच्या परीक्षांचे आराखडे तयार केले. त्यानुसार आता बारावीची परीक्षा होत आहे. फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी विषयांसाठी ७० गुणांची लेखी परीक्षा होईल तर ३० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असेल. गणित व इंग्रजी या विषयांसाठी ८० गुणांची लेखी परीक्षा होईल. गणितासाठी २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे. इंग्रजीसाठी २० गुणांची तोंडी परीक्षा होईल. 


असे बदलले स्वरूप 
अभ्यासक्रमाच्या कोणत्याही घटकांसाठी स्वतंत्र भाग दिला जाणार नाही. एका वाक्यात उत्तरे लिहा, थोडक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा यावर भर असेल. संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास करावा लागेल. क्लासवर अवलंबून न राहता कॉलेजमधील नियमित तासिकांबरोबरच पाठ्यपुस्तकांचा संपूर्ण अभ्यास करावा लागेल. कारण पुस्तकातील कोणत्याही भागावर प्रश्न परीक्षेत विचारले जातील. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांचे २९ प्रश्न असतील. तर गणित विषयावरील ३० प्रश्न असतील. मागील वर्षी मुख्य प्रश्न, उपप्रश्न, पर्यायी प्रश्न जास्त होते. यंदा मात्र सलग १ ते २९ असे प्रश्न असतील. 


यंदा दीड लाखांवर परीक्षार्थी 
बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा सध्या सुरु असून २१ फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरु होईल. नाशिक विभागात यंदा एक लाख ६८ हजार परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहे. विभागातील ९५० कनिष्ठ महाविद्यालयांतील २१५ परीक्षा केंद्रांवर आसनव्यवस्था करण्यात आली आहेत. नाशिकमध्ये ७४ हजार ५६४, जळगावमध्ये ५१ हजार ५७२, धुळे २५ हजार २८२, नंदुरबारमध्ये १६ हजार ९४० असे विद्यार्थी प्रविष्ठ असतील. 

 

 

बातम्या आणखी आहेत...