Rape case / लग्नाचे आमिष दाखवून वर्गमित्राचा २० वर्षीय तरुणीवर बलात्कार, दोघांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची द्यायचा धमकी

वडिलांनी विश्वासात घेताच मुलीने घडलेला प्रकार सांगितला, पोलिसांत गुन्हा दाखल  
 

दिव्य मराठी

Jul 31,2019 10:33:00 AM IST

वाळूज - सात महिन्यांपूर्वी ओळख झालेल्या २० वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करणाऱ्या गौरव जाधव (२२, रा. सिडको वाळूज महानगर-१) याच्याविरोधात पीडित मुलीच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांत मंगळवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व गौरव यांची जानेवारी २०१९ मध्ये बजाजनगर येथील एका संगणक क्लासेसमध्ये ओळख झाली. दरम्यान, आरोपीने पीडित मुलीचा मोबाइल क्रमांक मिळवून तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दोघे वारंवार फोनवर बोलत असत. पुढे गौरवने संबंधित मुलीला प्रपोज करत लग्न करण्याचे आश्वासन दिले. गौरवच्या आश्वासनावर पीडित मुलीने विश्वास ठेवून त्याला प्रेमासाठी व लग्नासाठी होकार दिला. त्यानंतर दोघे अनेकदा गौरवचा मित्र प्रमोद भोसले (२२, रा. बजाजनगर) याच्या खोलीमध्ये एकांतात भेटले. मुलीच्या मनात नसतानासुद्धा गौरव तिला लग्नाचे आमिष दाखवून तसेच तू भेटण्यास न आल्यास मी तुझ्याशी लग्न करणार नाही, असे धमकावत असल्याने पीडिता त्याच्यासोबत दुचाकीवरून भोसलेच्या खोलीवर जात असे. याच दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी एका मुलाच्या दुचाकीवर बसून जात असल्याचे पाहिले. त्याबाबत मुलीच्या वडिलांनी तिच्याकडे चौकशी केली. मात्र, भीतीपोटी मुलीने वडिलांनी काही एक सांगितले नाही.

वडिलांनी विश्वासात घेताच मुलीने घडलेला प्रकार सांगितला :
वडिलांनी तिला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता, भोसलेच्या खोलीमध्ये घेऊन गेल्यानंतर गौरवला लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देऊनसुद्धा त्याने जबरदस्ती आपल्यावर बलात्कार केला तसेच माझ्याविरोधात पोलिसांत गेलीस तर दोघांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. अशा प्रकारे गौरवने लग्नाचे आमिष दाखवत तसेच दोघांचे फोटो इतरांना सेंड करण्याची धमकी देत अनेकदा बलात्कार केल्याची माहिती मुलीने वडिलांना दिली. पालकांनी मुलीला मानसिक आधार दिल्यानंतर अखेर ३० जुलै रोजी तिने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून आरोपी गौरव जाधवविरोधात बलात्कार केल्याबाबतचा गुन्हा फौजदार पी. ए. गंभीरराव यांनी दाखल करून घेतला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

पीडित मुलगी पालकांसह पोलिसांत गेली आरोपी फरार
पीडित मुलगी पालकांसह पोलिसांत गेल्याची माहिती आरोपीला मिळताच त्याने बजाजनगर औद्योगिक परिसरातून पळ काढला. मात्र, फरार आरोपीच्या लवकरच मुसक्या आवळण्यात येतील, असे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितले.

X