आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरण बदलाचा फटका; उडीद, मुगानंतर आता तुरीच्या उत्पादनातही घटीची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा - गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील झालेल्या बदलाचा परिणाम तुरीवर होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धुक्याचा प्रकोप वाढल्यामुळे वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असून अळ्यांमध्येही वाढ होणार आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थकारणच बिघडणार आहे.

 
तालुक्यात तब्बल दीड-दोन महिने पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. तेव्हापासून अपेक्षित प्रमाणात उत्पन्न मिळण्याची आशा मावळली आहे. मुग, उडीद व सोयाबीन आदींच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाला असला तरी शेतकऱ्यांना या पिकांमधून काहीच साध्य झालेले नाही. उसानंतर नगदी पीक म्हणून तुरीकडे पाहिले जाते. उसाला पर्याय म्हणून अनेकांनी तूरीची पेरणी केली आहे. मोठ्या अपेक्षेने तुरीची जोपासना केली होती. 


मात्र, सध्या तुरीचे पीक संकटात सापडले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आणि पहाटेच्या दरम्यान पडण्याऱ्या धुक्यामुळे फुल गळती, पाने कुरतडणारे कीटक वाढले आहेत. दोन दिवसांपासून अचानक हवामानात बदल झाला आहे. यामुळे सध्या बहरात आलेली तूर हातची जाण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी फुलांची मोठ्याप्रमाणात गळती होण्यास प्रारंभ झाला आहे. फुलांची अधिक गळती झाली तर शेंगा लागण्यास अडचण येणार आहे. परिणामी उत्पादनावर परिणाम होणार आहे. काही ठिकाणी कोवळ्या शेंगा लागण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, तेथे पाणे गुंडाळणाऱ्या अळ्यांचा प्रभाव वाढला आहे. तसेच कोवळ्या शेंगावर हल्ला चढवणाऱ्या अळ्याही वाढल्या आहेत. यावर नियंत्रण नाही आल्यासही उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. 


पावसाच्या भरवशावर रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात, उत्पन्नाची नाही शाश्वती 
उमरगा शिवारात वातावरण बदलामुळे तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा चिंतेत आहे. 


संकटांची मालिका, दुष्काळी तालुक्यात समावेश नाही 
सातत्याने निसर्ग तर कधी शासनाच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. चांगल्या स्थितीत निघालेले उडीद अद्याप विकले गेले नाहीत. आधारभूत खरेदी केंद्र सुरू झाले आहे. मात्र, नोंदणी करून माल घेण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. महिनाभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे फळबागा व ऊसाच्या नुकसानभरपाईबाबत अद्याप काहीच घोषणा नाही. त्यात उमरगा तालुका दुष्काळी तालुक्यांच्या यादीत नाही. यामुळे तालुक्यात सर्वत्र उदासीनताच दिसून येत आहे. 


ज्वारी, भरभऱ्याची सर्वाधिक पेरणी 
गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यात रब्बीच्या पेरणीला सुरुवात झाली. आतापर्यंत केवळ ३५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.एकूण ३६ हजार १०८ हेक्टर क्षेत्रापैकी नऊ हजार ५१२ हेक्टरवर पेरा झाला आहे. सर्वाधिक ज्वारी व हरभरा क्षेत्रावर पेरणी झाली असून त्यापाठोपाठ गहू, मका, करडई, जवस, सूर्यफूल आदीची पेरणी झाली आहे. पाण्याचे नियोजन नसल्याने कोरडवाहू शेतजमिनीवर पावसाच्या भरवश्यावर पेरणीला सुरुवात केली आहे. 


अद्याप रक्कम नाही 
गतवर्षीच्या हंगामातील हरभरा, तुरीची रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. आधारभूत खरेदी केंद्रावर हरभरा व तुरीची विक्री करण्यात आलेली होती. नाफेडकडून पैसे मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. विक्री झालेल्या मालाचे किमान दिवाळीपूर्वी तरी पैसे मिळतील की नाही, या विवंचनेत शेतकरी आहेत. अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांपुढे नव्याने संकट उभे राहिले आहे. 


फवारणीसाठी लगबग 
शेतकऱ्यांनी अद्यापही चांगल्या उत्पादनाची आशा सोडलेली नाही. यामुळे शेतकरी सध्या फवारणी करण्यावर भर देत आहेत. तुरीवर अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे महागडी किटकनाशके फवारली जात आहेत. अगोदरच निसर्गाच्या फटक्याने आर्थिकदृष्ट्या गलितगात्र झालेले शेतकरी फवारणीसाठी पुन्हा उसनवारी करत असून उत्पन्न न झाल्यास कर्जबाजारी होतील. 

बातम्या आणखी आहेत...