यंदा वर्षभरापासून विचित्र वातावरणाचा अनुभव येत आहे. ऋतू कोणताही असो; पावसाळी व ढगाळ वातावरण कायमच आहे. वर्षभरात कधीही पाऊस येतो व आठ-आठ दिवस ढगाळ वातावरण कायम राहते. त्यामुळे वातावरणाचा समतोल बिघडला असून, रोगराईमध्ये वाढ झाली आहे. यंदा साथरोगांनी चांगलेच डोके वर काढले आहे. या वातावरणामुळे शेतकऱ्यांसोबतच सर्वच घटकांना हैराण केले आहे. सामान्य नागरिक पुरता मेटाकुटीला आला आहे. सुरुवातीला वेळेवर पावसाळा सुरू न झाल्यामुळे पेरणी वेळेवर झाली नाही. त्यामुळे अनेक पिकांचा हंगाम निघून गेला. मूग, उडीद, सोयाबीन हातातून गेले. कापूस, तूर, ज्वारी आदी पिकं लांबल्यामुळे उत्पादनामध्ये प्रचंड तूट आली आहे. शेतकरी पुरता कर्जात बुडवण्यास यंदाचे वातावरण कारणीभूत ठरले आहे. सोबतच सततच्या ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे अनेक आजारांनी डोके वर काढले. त्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत.
- राजू गोफणे, अमरावती