आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदिर, भागवत सप्ताहातील भोंगे बंद करा, वारकरी मंडळाचे नवनाथ आंधळे महाराज यांची पुरोगामी मागणी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महेश जोशी  

औरंगाबाद - मंदिर, भागवत कथा आणि हरिनाम सप्ताहात जोरात वाजवले जाणारे भोंगे बंद करण्याची गरज अखिल भारतीय वारकरी मंडळाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष नवनाथ आंधळे महाराज यांनी व्यक्त केली आहे. भोंग्यांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होतो. आजारी लोकांना त्रास होतो. हा आवाज इतरांनाही नकोसा वाटतो. ज्यांना खरोखर भजन, कीर्तन ऐकायचे असेल  ते मंदिरात, सप्ताहात येतील. त्यांच्यापर्यंत घरपोच आवाज पोहोचवायची गरज नसल्याचे आंधळे महाराज यांनी म्हटले आहे. सध्या शहरात ठिकठिकाणी १५० च्या वर भागवत सप्ताह सुरू आहेत. गेले वर्ष लोकसभा, विधानसभा निवडणुकांत गेले. आता शहराला पालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या संख्येने सप्ताहाचे आयोजन केले जाते. साधारणपणे दरवर्षी दिवाळी ते गुढीपाडव्यापर्यंत सप्ताह सुरू असतात. नेमका हाच काळ परीक्षांचा असतो. या पार्श्वभूमीवर नवनाथ आंधळे महाराजांनी सप्ताहात भोंगे जाळण्याबाबत प्रबोधन सुरू केले आहे.भोंग्यांची गरजच नाही


आंधळे महाराज म्हणाले, ज्यांना  भागवत, भजन, कीर्तन ऐकायचे  आहे ते सप्ताहाच्या मंडपात येतील. त्यांच्यासाठी मंडपात ऐकू येईल एवढा आवाज ठीक आहे. याप्रमाणेच ज्यांना देवाची भक्ती करायची अहे ते मंदीरात येतील. घरात झोपून भक्ती करणाऱ्यांची काळजी कशाला करायची? मात्र, सप्ताह असो किंवा मंदिरे... येथे मोठ्या आवाजात टांग्यात भक्तिगीते लावली जातात. आज प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये वाटेल ती गाणी आहेत. टीव्हीवर धार्मिक कार्यक्रम, गाणी सुरू असतात. ती भोंग्यावर लावण्याची गरज नाही. हे चुकीचे आहे. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसतो. सकाळचा अभ्यास लक्षात राहतो. मात्र, सकाळी भोंग्यांच्या आवाजाने अभ्यासात अडथळा येतो. आजारी नागरिक, ज्येष्ठ नागरिकांना आवाज नकोसा वाटतो. यामुळे मंदिरांचे ट्रस्टी आणि सप्ताहाच्या आयोजकांनीच भोंग्याचा वापर टाळण्याची गरज आंधळे महाराजांनी व्यक्त केली आहे. आपल्या सप्ताहात आवाज मर्यादेत असतो. रात्री १० च्या आत संपवतो, असे ते म्हणाले.
 

हासुद्धा परमार्थ
 
विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहे. सशक्त, सुदृढ देश घडवण्यासाठी विद्यार्थी संस्कारही झाले पाहिजेत. भजन, कीर्तनातून  संस्कार, भविष्याची दिशा मिळते. मात्र, हे संस्कार देताना इतरांना त्रास होणार यासाठी आवाजाची मर्यादा पाळायलाच हवी. हासुद्धा परमार्थ आहे. सप्ताहाच्या आयोजकांनी, ट्रस्टींनीच आवाजाच्या मर्यादा पाळल्या तर ते देवालाही आवडेल.
- नवनाथ आंधळे महाराज, जिल्हाध्यक्ष, अ. भा.  वारकरी मंडळ