हवामानात वेगाने बदल / पुढील तीन दिवसांत काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस, गारपिटीची शक्यता

एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे पडलेल्या गारा. एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे पडलेल्या गारा.

थंड, शीत, बाष्पयुक्त वाऱ्याचा संगम होऊन ढगाळ वातावरण, पिकांचे नुकसान

संतोष देशमुख

Dec 13,2019 10:28:00 AM IST

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी उत्तरेकडील शीत वाऱ्याचा जोर वाढला होता. परिणामी १७.३ अंशांवर गेलेल्या किमान तापमानात घट होऊन ते ८ डिसेंबर रोजी १३.१ अंशांवर आले होते. मात्र, शीत वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला आहे. कमी हवेचा दाब निर्माण होऊन थंड, शीत, बाष्पयुक्त वाऱ्याचा संगम होऊन आकाशात ढगांची गर्दी होत आहे. या बदलत्या हवामानामुळे येत्या तीन दिवसांत कोल्हापूर, महाबळेश्वर, सातारा, नागपूर, अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस व गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसा अंदाज अकोला ग्रामीण हवामान विभाग, भारतीय हवामान विभागानेही वर्तवला आहे. कडाक्याची थंडी डिसेंबरचे ११ दिवस उलटले तरी दाखल झालेली नाही. बदलत्या हवामानामुळे किमान तापमान सरासरीपेक्षा १ ते ५ अंश व कमाल १ ते २ अंशांनी जास्त राहिले आहे. पाच दिवसांपूर्वी १०१८ हेक्टापास्कलपर्यंत वाढलेला हवेचा वेग ११ डिसेंबर रोजी ६ हेक्टापास्कलने कमी होऊन तो १०१२ पर्यंत खाली घसरला होता. म्हणजेच कमी हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण होऊन आर्द्रताही वाढली आहे. वातावरणातील या सर्व घटकांमुळे बहुतांश शहरांवर ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी पाऊस व गारपीट होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.


याचबरोबर यंदा ओल्या व कोरड्या दुष्काळात तुरीचे, कपाशीचे पीक चांगले आले होते. मात्र, आता गारपीट अन् अवेळी पावसाच्या संकटाने धोक्यात आले आहे. याचबरोबर आंबा मोहरावर गंभीर परिणाम झाला असून उत्पादनात ३० टक्क्यांवर घट निश्चित मानली जात आहे. डाळिंब, मोसंबी, भाजीपाला, रब्बीतील गहू, हरभऱ्यावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.


कमी दाब पट्ट्यात गारपीट


तापमान व हवेच्या कमी दाबाचे पट्टे थंडीबरोबरच बाष्पयुक्त वारे खेचून आणतात. याचा आकाशात संगम होऊन ढगांची चादर पसरते. आकाशातील उणे तापमानात बाष्प, शीत व उष्ण वाऱ्याचा संगम होऊन ढगांचे आच्छादन तयार होते. या आच्छादनात उणे तापमानामुळे पाण्याच्या गारा तयार होतात व जेथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो तेथे गारपीट होते.


व्हायरलचा फटका


थंड, दमट, गरम वातावरणामुळे शहरात डेंग्यूबरोबरच ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी, विषाणुजन्य आजाराने रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून व्हायरलचा घरोघरी जबर फटका बसल्याचे चित्र दिसून येत आहे.


एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे गारपीट, नुकसान


एरंडोल : तालुक्यातील उत्राण परिसरात गुरुवारी दुपारी ३.४५ ते चार वाजेपर्यंत जोरदार गारपीट झाल्याने परिसरातील लिंबासह इतर पिकांचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी एरंडोल व परिसरात पावसाला सुरुवात झाली. त्यात जवखेडे, अंतुर्ली, तळई या गावांसह तालुक्यातील लिंबासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्राण परिसरात दहा मिनिटे पाऊस झाला. त्यात जोरदार गारपीट झाली असून परिसरातील लिंबाचे तसेच हरभरा, गहू व पेरूचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, उत्राण परिसरात गारपीट झाली असल्याचे फक्त एरंडोलच्या तहसीलदार अर्चना खेतमाळीस व नायब तहसीलदार पी. एस. शिरसाठ यांनाच माहीत होते. तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे बाहेरगावी असल्याने त्यांना याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.


धुळ्यात शाळांचे पत्रे उडाले, वृक्ष उन्मळून पडले


धुळे : शहरासह परिसरात गुरुवारी दुपारी वादळासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वृक्षांच्या फांद्या विद्युत रोहित्रांवर पडल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महापालिकेच्या शाळा क्रमांक तीनच्या तीन वर्गखोल्यांवरील पत्रे उडाले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा, मका, ज्वारी, बाजरी ओली झाल्याने नुकसान झाले. शहरात गुरुवार दुपारी दीड वाजेनंतर अर्धा तास जोरदार पाऊस झाला. शहरातील मालेगाव रोड, स्टेशन रोड, अग्रसेन महाराज चौक ते दसेरा मैदानापर्यंत अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वृक्ष विजेच्या वाहिन्यांवर पडल्याने वीजवाहिन्या तुटल्या होत्या.

X
एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे पडलेल्या गारा.एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे पडलेल्या गारा.
COMMENT