Maharashtra Special / मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस अडचणीत ? 'ईडी'मध्ये तक्रार दाखल


तक्रारीत पदाचा गैरवापर केल्याचा आरोप

Aug 27,2019 10:41:33 PM IST

मुंबई- विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे. या सगळ्यात ईडी सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विरोधातील नेत्यांना ईडीची भीती दाखवून सत्ताधारी भाजप पक्ष विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये येण्यास भाग पाडत आहे, असाही आरोप विरोधकांकडून होत आहे. पण, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीसस ईडीमध्ये अडकण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधातच ईडीमध्ये तक्रार दाखल झाली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्या हितसंबंधांसाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ईडीकडे दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांचे वेतन आधी स्टेट बँक ऑफ इंडियामधून व्हायचे. पण, मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत हे व्यवहार एसबीआयकडून काढून घेत आपली पत्नी काम करत असलेल्या अॅक्सिस बँकेकडे सोपवले. असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अमृता फडणवीस अॅक्सिक बँकेत उच्च पदावर काम करतात.


तक्रारदाराने याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात देखील जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर 29 ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. ऐन विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

X