आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी वाचला विकासकामांचा पाढा, तर धनगर आंदोलकांची घोषणाबाजी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - भाजपच्या वतीने आयोजित येथील जाहीर सभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सुमारे २२ मिनिटांच्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांचा आणि घेतलेल्या निर्णयांचा पाढाच वाचून दाखवला. तसेच आगामी निवडणुका लक्षात घेऊन त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी मागेल तेवढा निधी देण्याचे आश्वासन दिले. तर या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे भाषण चालू होताच धनगर समाजाच्या तरुणांनी आरक्षणाची जोरदार मागणी करून मुख्यमंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. परंतु मुख्यमंत्र्यांनी प्रसंगावधान राखून आंदोलकांशी चर्चा करण्याचे भाषणात जाहीर केल्यानंतर आंदोलकांचा रोष मावळला. 

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगोलीमध्ये आले होते. तर याच दौऱ्यात भाजपच्या वतीने बचत गट व महिला मेळाव्याचे रामलीला मैदानावर आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या भाषणाला सुरुवात होताच, सभेच्या ठिकाणी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोला, जय मल्हार अशा घोषणा धनगर समाजाच्या वतीने सुरू करण्यात आल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पिवळे झेंडे दिसतात ते आमचेच लोक आहेत. आम्ही धनगर आरक्षणाची शिफारस केंद्र शासनाकडे केली असून, आंदोलकांना माझ्याकडे घेऊन या, मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असे भाषणात घोषित केल्याने आंदोलकांचा रोष मावळला आणि फडणवीस यांचे भाषण पुढे सुरू झाले. 

 

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने गेल्या चार साडेचार वर्षांत घेण्यात आलेल्या विविध निर्णय आणि करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा पाढाच वाचून दाखवला. त्यामध्ये मराठा आरक्षण, असंघटित कामगारांना पेन्शन, शहरी आणि ग्रामीण घरकुल योजना, शेतकऱ्यांना अनुदान आणि पेन्शन, झोपडपट्टी सुधार योजना, निवासी अतिक्रमणे नियमित करणे, रस्ते विकास, कृषी विकास, धनगर आरक्षण आदी योजनांचा पाढा वाचून दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबी पाहिली असून त्यांना गरिबांबद्दल तळमळ असल्यामुळे त्यांनी गरीब, शेतकरी, मजूर यांच्या उत्थानासाठी गेल्या साडेचार वर्षांत खूप मोठे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

मुख्यमंत्री फडणवीस यांची नांदेडला धावती भेट 
नांदेड | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमाराला विमानतळावर आगमन झाले. हिंगोली येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री हेलिकाॅप्टरने विमानतळावर आले. तिथून ते विमानाने मुंबईला रवाना झाले. विमानतळावर जिल्हाधिकारी अरुण कांबळे, आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय जाधव, भाजप महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. राजशिष्टाचाराप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागताला महापौर शीलाताई भवरे यांनी हजर राहणे अगत्याचे होते. परंतु काँग्रेस शिबिरात व्यग्र असल्याने त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागताला जाणे टाळले. 


 

बातम्या आणखी आहेत...