आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

8 वर्षांनी करार, तरी काँग्रेसपेक्षा 9% कमी दराने मोदींनी खरेदी केली रफाल विमाने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- काँग्रेस सरकारच्या २००८ मधील रफाल खरेदी प्रस्तावाच्या तुलनेत नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षांचा कालखंड गेल्यानंतरही २०१६ मध्ये ९ टक्के कमी दराने रफालची विमाने खरेदी केली आहेत. त्याशिवाय रफालमधील युद्धसामग्री तर २० टक्क्यांपेक्षा कमी दराने खरेदी केल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. काँग्रेसने कायम देशाच्या संरक्षणाची दलाली केली आहे. आताही त्यांना संरक्षणातील 'माल' खाण्यासाठीच सत्तेत यायचे असल्याची जहरी टीकाही त्यांनी केली. 

 

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे (भाजयुमो) 'विजय लक्ष्य-२०१९' या राज्यस्तरीय कार्यशाळेचा गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संघटन मंत्री विजय पुराणिक आणि भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री म्हणाले, 'काँग्रेसला हे आधीच माहिती होते, आपण आधी ज्याप्रमाणे 'बोफोर्स' विमानांचा घोटाळा केला. अगदी त्याप्रमाणे ऑगस्टा वेस्टलँडचा हेलिकॉप्टर घोटाळा उघडकीस येणार आहे. त्यामुळे त्यांनी 'खोटं बोल पण रेटून बोल' या म्हणीप्रमाणे नरेंद्र मोदी सरकारने रफाल खरेदीत घोटाळा केला, असा आरोप केला आहे. पण यूपीए पेक्षा कमी किमतीत आणि सुधारीत विमाने खरेदी केली आहेत. काँग्रेसने आत्तापर्यंत दलालांना मध्यस्थी घालून युद्धसामग्री खरेदी केली आहे, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मोदींनी फ्रान्समध्ये जाऊन गव्हर्नमेंट टु गव्हर्नमेंट विमानांची खरेदी केली. पाकिस्तान आणि चीनकडे ४०० रफाल विमाने आहेत, पण आपण युद्धसज्ज नसल्याचे वायुसेनेच्या प्रमुखांनी सांगितल्यामुळे मोदींनी तातडीने विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थान अॅरो नॉटिकल लिमिटेड अर्थात एचएएला काम न देता रिलायन्सला देण्यामागेही किंमत कमी करणे आणि मनुष्यबळाअभावी वेळेची बचत करण्याचा मोदींचा उद्देश होता, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. दानवे यांनीही खुमासदार शैलीत भाषण केले, टिळेकर यांनी प्रास्ताविक केले.
 
८९ लाख युवकांना मिळाला रोजगार 
राज्यात ८९ लाख युवकांना रोजगार मिळवून दिला तर १ कोटीपेक्षा अधिक रोजगार केंद्र सरकारने दिले आहेत. देशात १० कोटी लोकांना मुद्रा योजनेचे कर्ज दिलेे. ४ कोटींना वीज, ६ कोटी लोकांना उज्ज्वला गॅस दिला. १ कोटीपेक्षा अधिक बेघरांना घरे दिली. भाजयुमो कार्यकर्त्यांनी ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्णयांची माहिती घराघरात पोहोचवा, अशा सूचना देत मुख्यमंत्र्यांनी 'विजय लक्ष्य-२०१९' या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोपात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

 

लष्कराच्या अधिकाऱ्यांना हवी होती ५२ टक्के दलाली 
त्या काळात रफालच्या खरेदीत काँग्रेसला दलाल मिळत नव्हता, त्यामुळे खरेदीला उशीर होत होता. खरेदी झाली असती तर ५२ टक्के दलाली काँग्रेसला, तर ५२ टक्के लष्करातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणार होती, असा अनाकलनीय दावाही फडणवीस यांनी या वेळी केला. या ५२ टक्क्यांमध्ये २७ टक्के लष्कराच्या अधिकाऱ्यांचा आणि २५ टक्के कर्मचाऱ्यांना मिळणार होते, असेही ते या वेळी म्हणाले.