आम्ही प्रेम प्रकट / आम्ही प्रेम प्रकट करतो, शिवसेना मात्र लपून प्रेम करते : मुख्यमंत्री

Nov 11,2018 10:40:00 AM IST

नागपूर - "आम्ही शिवसेनेवरील आमचे प्रेम प्रकट करत असतो, तर ते लपून प्रेम करणारे आहेत,’ असे स्पष्ट करताना “आम्हाला शिवसेनेसोबत युती करायचीच आहे. ते इतर वेळी काय बोलतात हे सोडून द्या. पण उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण तुम्ही एेकले असेल तर सर्व काही स्पष्ट होईल,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरील भाजपचे प्रेम हे एकतर्फी नाही, असे स्पष्टच सांगितले.


शनिवारी नागपुरात रामगिरी येथे फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेला कुठलाही निर्वाणीचा इशारा आपण दिलेला नव्हता, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, पिंपरी-चिंचवड येथे बोलताना आपण येथील दोन लोकसभा मतदारसंघांतून मोदींना पाठिंबा देणारे खासदार निवडून आणू एवढेच बोललो होतो. आम्हाला शिवसेनेसोबत युती करायचीच आहे. इतर वेळी शिवसेना नेते काय बोलतात ते सोडून द्या. मात्र, उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण ऐकले असेल तर त्यातून बरेच काही स्पष्ट होते. त्यांनादेखील युती करायची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. भाजपचे शिवसेना प्रेम एकतर्फी मुळीच नाही. आम्ही ते प्रकट करतो, ते लपून करतात, असेही मुख्यमंत्री एका प्रश्नावर बोलताना म्हणाले.


आगामी हिवाळी अधिवेशनापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार व्हायला हवा, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले, तर सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांची भूमिका आहे किंवा नाही यावर सरकार उच्च न्यायालयातच भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.


अवनी वाघिणीला ठार मारावे लागले, याचे दु:ख असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, सरकारपुढे कधी अतिशय कठीण पर्याय असतात. आम्ही वाघांचे संवर्धनच करतो. मात्र, कधी वाघ नरभक्षी झाल्यास लोकांचाही दबाव असतो. अशा वेळी परिस्थिती पाहून कठोर निर्णय घेतले जातात. आता तिला बेशुद्ध करण्यासाठी डार्टचा वापर प्रथम झाला की थेट मारण्यात आले, हा प्रक्रियेचा भाग आहे. यात मंत्री कुठेही थेट आदेश देत नसतात, असे सांगत फडणवीस यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांचा यात दोष नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगून टाकले. वाघिणीला ठार मारण्याच्या प्रक्रियेत दोष असतील तर त्याची चौकशी आम्ही स्थापन केली असून दोषी आढळल्यास कारवाईदेखील होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कन्झर्व्हेशन अॅक्टिव्हिस्ट या नात्याने केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. ती स्वाभाविकपणे तीव्र असू शकते. त्यांनी माझ्यावरही कधी टीका केली आहे. आम्हीही ती संयमाने घेतली पाहिजे. त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही चौकशी समिती स्थापन केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


झीरो टॉलरन्सच्या सूचना
सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या वाढत्या घटनांवर बोलताना आपल्याकडे पुरेसे कडक कायदे असून त्यात कडक शिक्षेची तरतूद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अशा घटनांबाबत पोलिसांना झीरो टॉलरन्सच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारिप- बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप जिंकला की आमच्यावर ईव्हीएम अथवा कुठला पक्ष मॅनेज झाल्याचे आरोप होतच असतात. आंबेडकरांशी आजवर कधीही भाजपने युती केली नाही. एमआयएमशी युती होण्याचा प्रश्नच नाही. जे पक्ष आरोप करतात, त्यांनीच आजवर भाजपशी वारंवार युती केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


दरम्यान, यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून मनेका गांधी यांचे गुरू प्रेमसाईबाबा यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे, याकडे लक्ष वेधले असता मी प्रेमसाईबाबा यांना ओळखत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मनेका गांधी यांच्याशी प्रेमसाईबाबा यांच्याबद्दल कुठलीही चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले.

औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे
सध्या उत्तर प्रदेशात शहराचे नामांतर करण्याचा धडाका सुरु अाहे. तसेच महाराष्ट्रातील काही शहरांच्या नामांतराचाही मुद्दा अनेक वर्षांपासून गाजत अाहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘औरंगाबाद, उस्मानाबादचे नाव अनुक्रमे संभाजीनगर आणि धाराशिव करण्याचा प्रस्ताव पूर्वीच्या युती शासनाच्या काळातच झाला आहे. तो केंद्राकडे प्रलंबित असताना मध्यंतरी त्यावर न्यायालयात याचिका झाल्याने तो प्रलंबित राहिला. याबाबत पाठपुरावा करू.

X