आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत खलबते : लाेकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठका; मुख्यमंत्री फडणवीस मध्यरात्रीच राजधानीत, आरक्षण, युतीबाबत माेदी- शहांशी चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येण्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे मंगळवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी तातडीने दिल्लीला बोलावले आणि पहाटे तीन वाजेपर्यंत राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. या बैठकीत धनगर आरक्षण आणि युतीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच खासदारांच्या प्रगती पुस्तकाबाबतही चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत मुख्यमंत्री मुंबईतच होते. मात्र, त्यानंतर त्यांना अचानक शहा यांचा फोन आला व त्वरित दिल्लीला येण्यास सांगितले. पंतप्रधान बुधवारी सोलापूरला येणार असले तरी त्यांना मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यास वेळ मिळणार नसल्याने आणि शहाही तेव्हा उपस्थित नसल्यानेच मुख्यमंत्र्यांना दिल्लीला त्वरित बोलावले. त्यानंतर फडणवीस यांनी लगेचच उर्वरित बैठका रद्द केल्या व दिल्ली गाठली. विमानतळावरून ते थेट अमित शहा यांच्या बंगल्यावर गेले. तेथे दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर ते मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले. पंतप्रधान बुधवारी सकाळी सोलापूरला येणार होते.

सोलापूरमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणावर असल्याने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत काय करता येईल याची चाचपणी झाली. हा विषय केंद्राच्या अखत्यारीत असल्याने लवकरात लवकर निर्णय घेतला तर निवडणुकीत त्याचा फायदा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 

युतीची बोलणी सुरू असतानाच शहा यांच्या लातूरमधील वक्तव्यानंतर शिवसेनेबरोबर संबंध ताणले होते. याबाबतही बैठकीत चर्चा झाली. शिवसेनेसाेबत युतीचे प्रयत्न सुरू ठेवा. मात्र, जर युती झाली नाही तर काय करायचे याचा प्लॅनही तयार करून ठेवा, असे पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते. 

 

खासदारांचा अहवाल पंतप्रधानांकडे सादर 
या राज्यातील भाजपच्या २३ खासदारांच्या कामगिरीचा अहवालही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी पंतप्रधान माेदी आणि अमित शहा यांना दिल्याचे समजते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मोदी यांनी राज्यातील खासदारांचे प्रगतिपुस्तक ८-१० दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले हाेते. या अहवालाच्या आधारावरच आगामी निवडणुकीत खासदारांना पुन्हा संधी द्यायची की नाही याचा निर्णय हाेणार आहे. 

 

भाजपला ८ खासदारांच्या भवितव्याबाबत चिंता 
भाजपने यापूर्वीच राज्यातील खासदारांचा सर्व्हे करून काेणता खासदार पुन्हा निवडून येऊ शकताे याची चाचपणी केलेली आहे. त्यांच्या अंदाजानुसार, २३ पैकी फक्त १५ खासदार पुन्हा निवडून येऊ शकतात. त्यामुळेच कोणत्या खासदारांनी ५ वर्षांत काय कामे केली आणि तो पुन्हा मतदारांसमोर जाऊ शकतो का, याची माहितीही या सर्व्हेत गोळा करण्यात आली होती. त्या व मुख्यमंत्र्यांच्या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल. 

 

शरद पवारांच्या बंगल्यावर राहुल गांधी, खरगे; जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याचे संकेत 
लाेकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागावाटपांच्या मुद्द्यावरून बुधवारी दिवसभर दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू होते. सायंकाळी शरद पवार यांच्या घरी राहुल गांधींच्या भेटीनंतर अंतिम जागावाटप दृष्टिक्षेपात आल्याचे संकेत मिळत आहेत. फक्त नंदुरबार आणि अहमदनगरच्या जागेबाबतचा निर्णय होऊ शकला नव्हता. पवार-राहुल भेटीनंतर दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्रही सुरूच होते. 

 

भाजप व शिवसेनेतील युतीत दुरावा वाढत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे. बुधवारी सायंकाळी '६ जनपथ' या शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राहुल गांधी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पोहोचले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल हेदेखील बैठकीला उपस्थित होते. पवार-राहुल गांधी यांच्यादरम्यानची ही बैठक सुमारे चाळीस मिनिटे सुरू होती. या चर्चेत नंदुरबार आणि अहमदनगर वगळता उर्वरित जागांचा तिढा सुटल्याचे समजते. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला होता. या ठिकाणाहून काँग्रेसच्या माणिकराव गावित यांनी विक्रमी वेळा खासदार होण्याचा बहुमान मिळवला आहे. मात्र गेल्या निवडणुकीत भाजपच्या हिना गावित येथून निवडून आल्या. हिना व त्यांचे वडील राष्ट्रवादीतून भाजपत आलेले आहेत, तर अहमदनगरची जागा सध्या राष्ट्रवादीकडे असून राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुत्र सुजय विखे पाटील यांच्यासाठी ती जागा काँग्रेसला हवी आहे. नगरची जागा विखेंच्या पुत्रासाठी सोडण्याची राष्ट्रवादीची तयारी असून त्या बदल्यात राष्ट्रवादीने नंदुरबारची मागणी काँग्रेसकडे केली आहे. 

 

पक्षप्रमुखांनंतर राज्यातील नेत्यांमध्येही झाला खल 
पवार - राहुल यांच्या भेटीनंतर काही वेळातच देशाध्यक्ष  अशोक चव्हाण यांच्या दिल्लीतील घरी काँग्रेसची बैठक झाली. विखे, माणिकराव ठाकरे, सहप्रभारी आशिष दुआ, संपतकुमार व सोनल पटेल आदी उपस्थित होते. नंदुरबार व नगरच्या जागेबाबतच यात खल झाल्याचे समजते. या बैठकीनंतर रात्री उशिरा अशोक चव्हाण यांची मल्लिकार्जुन खरगेंसोबत बैठक होणार असून चर्चेचा तपशील राहुल यांना कळवण्यात येणार हाेता. 

 

दाेेन दिवसांत चित्र स्पष्ट हाेईल : राधाकृष्ण विखे 
या बैठकीनंतर पत्रकारांशी बाेलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, 'दाेन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली त्यात जागावाटपावर सविस्तर चर्चा झाली. येत्या एक- दाेन दिवसांत काॅंग्रेस- राष्ट्रवादीच्या जागावाटपाचा निर्णय अंतिम हाेणार अाहे. काेणत्याही जागेवरून अामच्यात वाद नाही. नंदुरबार लाेकसभा मतदारसंघ काॅंग्रेसकडेच राहणार अाहे. अागामी निवडणुकीत भाजप- शिवसेनेला दाेन्ही पक्ष एकत्रित सामाेरे जाणार अाहाेत.' 

बातम्या आणखी आहेत...