Home | Maharashtra | Mumbai | CM Fadnavis start planing to succeed Karnataka's Operation Lotus 

कर्नाटकचे ऑपरेशन लोटस यशस्वी करण्यासाठी फडणवीस सक्रिय? काँग्रेसच्या फुटीर आमदारांची मुंबईतील हॉटेलात सोय  

विशेष प्रतिनिधी | Update - Feb 10, 2019, 09:26 AM IST

आमदारांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांना वेठीस धरण्यात आले असून पोलिसांचा खडा पहारा या हॉटेलभोवती ठेवण्यात आला आहे. 

 • CM Fadnavis start planing to succeed Karnataka's Operation Lotus 

  मुंबई- कर्नाटकातील काँग्रेस - जेडीएसचे संयुक्त सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने जानेवारी महिन्यात आखलेले 'ऑपरेशन लोटस' एकदा अयशस्वी ठरल्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपने याच ऑपरेशनचा दुसरा अंक सुरू केला आहे. या दुसऱ्या अंकाचा एक भाग म्हणून कर्नाटकमधील काँग्रेसच्या चार आणि जेडीएसच्या एका आमदाराला मुंबईतील पवई येथील हॉटेलमध्ये आणून ठेवले आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर देखरेख ठेवण्याकामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा 'लाड'का आमदारच सक्रिय झाल्याने ऑपरेशन लोटसचा दुसरा अंक यशस्वी करण्यासाठी खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच सक्रिय झाले आहेत का, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे. गंभीर बाब म्हणजे या आमदारांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांना वेठीस धरण्यात आले असून पोलिसांचा खडा पहारा या हॉटेलभोवती ठेवण्यात आला आहे.

  कर्नाटक विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असूनही सत्ता हस्तगत करण्यात अपयशी ठरल्याची सल भाजपला स्वस्थ बसू देत नाही. एकदा अयशस्वी ठरल्यानंतरही पुन्हा एकदा भाजपने काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले असून यापैकी पाच आमदारांना मुंबईतील पवई परिसरातील हॉटेल रेनेसाँ येथे ठेवण्यात आले आहे. हॉटेल व्यवस्थापनात वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर 'दिव्य मराठी'ला दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक विधानसभेतील रमेश जारकीहोळी (गोकाक), महेश कुमठळ्ळी (अथणी), बी.सी.पाटील (हिरेकेरूर), बी. नागेंद्र (बेल्लारी ग्रामीण) हे काँग्रेसचे, तर नारायण गौडा (केआर पेठ) हे जेडीएसचे आमदार वास्तव्यास आहेत. या पाच जणांवर देखरेख ठेवण्यासाठी येदियुरप्पांचे चिरंजीव विजीत, अश्वथ नारायण (मल्लेश्वरम) हे भाजपचे विद्यमान आमदार आणि योगीश्वर हे माजी आमदार संबंधित हॉटेलमध्येच डेरा टाकून आहेत, तर महाराष्ट्र भाजपचा पदाधिकारी असलेला आणि मुख्यमंत्र्यांचा अतिशय 'लाड'का असलेला एक आमदारही त्यांच्या दिमतीला आहे. या 'लाड'क्या आमदारासोबत व्यावसायिक संबंध राखून असलेल्या एका बिल्डरचे नवी मुंबईतील विमानतळाशेजारील मोक्याचे भूखंड नियमबाह्य पद्धतीने बळकावल्याचे प्रकरण पावसाळी अधिवेशनादरम्यान उघड झाले होते. असा हा मुख्यमंत्र्यांचा 'लाड'का आमदारच कर्नाटकातील फुटीर आमदारांची बडदास्त ठेवण्याच्या कामी असल्याने या राजकीय नाट्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महत्त्वाच्या भूमिकेत आहेत का? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

  मुख्यमंत्र्यांकडून सत्तेचा गैरवापर : मलिक
  कर्नाटकमधील सरकार पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना वेठीस धरू नये. राजकीय फायद्यासाठी डांबून ठेवलेल्या आमदारांची सुरक्षा करणे हे महाराष्ट्र पोलिसांचे काम नाही. या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस हे सत्तेचा आणि व्यवस्थेचा दुरुपयोग करत आहेत, असा आरेाप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

  असे असेल ऑपरेशन लोटस-२?
  कर्नाटक विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ फेब्रुवारी रोजी सुरू झाले असून येत्या १५ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अर्थसंकल्प मंजुरीसाठीच्या मतदानाच्या वेळी फुटीर आमदारांना गैरहजर ठेवत सरकार पाडण्याची रणनीती आखण्यात आली आहे. कोणत्याही वित्तविषयक विधेयकावर झालेल्या मतदानात सरकार बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरले तर ते सरकार अल्पमतात आल्याचे मानले जाते व राज्यपाल संबंधित सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगतात. कर्नाटक विधानसभेच्या एकूण २२४ जागांपैकी १०४ जागा भाजपकडे असून काही अपक्षांच्या मदतीने ११७ आमदारांसह काँग्रेस-जेडीएस सत्तेवर आहे. भाजपला बहुमतासाठी ९ आमदारांची आवश्यकता असून अधिकाधिक आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.

Trending