आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवालांनी घेतली पंतप्रधानांची भेट; दिल्लीतील स्थितीवर चर्चा

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसद भवन परिसरात भेट घेतली. या वेळी त्यांनी मोदींसोबत दिल्लीतील परिस्थितीवर चर्चा केली. 

दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर केजरीवाल यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींची भेट घेतली. भेटीनंतर केजरीवालांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासूनच पंतप्रधानांकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मोदींसोबत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधामुळे राजधानीत उफाळलेल्या हिंसाचारानंतरच्या परिस्थितीवर चर्चा केली. तसेच दिल्लीच्या विकासासाठी सहकार्य करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. मोदींनीही त्यांची मागणी मान्य केली.  तसेच दिल्लीत रविवारी अफवांनी जोर धरला होता. मात्र अफवांमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्ली पोलिसांनी तत्काळ पावले उचलल्याचे त्यांनी सांगितले. अफवांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी उत्तम काम केल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, केजरीवालांनी कोरोना विषाणूच्या धोक्यापासून बचावासाठी काही उपाययोजना आखण्याबाबत मोदींसोबत चर्चा केली. कारण दिल्लीत कोरोना विषाणूची काही प्रकरणे समोर आली आहेत. दिल्लीत पुन्हा असा हिंसाचार होऊ नये यासाठी मोदींना विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधानांनीही दिल्लीत पुन्हा असा प्रकार होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. दिल्लीत गेल्या आठवड्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधाने हिंसक वळण घेतले होते. दंगेखोरांनी उत्तरपूर्व दिल्लीच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली होती. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले होते. दंगलीत आतापर्यंत ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, भाजप नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रक्षोभक भाषणांविषयी चर्चा झाली का, असा प्रश्न पत्रकारांनी केजरीवालांना विचारला. मात्र याबाबत कुठलीही चर्चा न झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

काँग्रेसचा निशाणा : मुख्यमंत्री केजरीवालांनी भाजपसमोर टेकले गुडघे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीवर काँग्रेसने निशाणा साधला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर केजरीवालांनी केेलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षासमोर गुडघे टेकल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका काँग्रेसने केली. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, मोदींच्या भेटीनंतर केजरीवाल अत्यंत आनंदी होते. हे दृश्य धक्कादायक होते. यामुळे त्यांनी भाजपसमोर गुडघे टेकल्याचे स्पष्ट होत आहे. केजरीवालांनी दिल्लीतील दंगलीत ५० जणांच्या मृत्यूविषयी मोदींशी कुठलीही चर्चा केली नाही हे आश्चर्यकारक आहे. तसेच, केजरीवालांनी हिंसा भडकवणाऱ्यांविरोधात कारवाई का केली नाही, असा जाब मोदींना का विचारला नाही, असा सवाल सिंघवी यांनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...