आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील 'स्मार्ट लायटिंग' अंधारातच; ठेकेदारांकडून निविदेला मिळेना प्रतिसाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी स्मार्ट लायटिंगचा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी ठेकेदारच मिळत नसल्याची धक्कादायक बाब समाेर आली असून जानेवारीपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत एकदा मूळ निविदाच रद्द करावी लागली हाेती. त्यानंतर सुधारित निविदा काढल्यानंतर त्यासही प्रतिसाद नसल्यामुळे मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे. दरम्यान, यापूर्वीच्या एलईडी घाेटाळ्याचा धसका लक्षात घेत ठेकेदार काम करण्यासाठी पुढे येत नसल्याची चर्चा आहे. 

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत नाशिक दत्तक घेतले असून दीड वर्षानंतर ठाेस प्रकल्प करता आलेला नाही. मध्यंतरी एसटी महामंडळाची बससेवा महापालिकेमार्फत चालवणे, शहरात सीसीटीव्ही बसवणे व स्मार्ट लायटिंगचा लखलखाट करण्यासारख्या याेजनांचा विचार त्यांनी बाेलून दाखवला. त्यानुसाार तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी राज्याच्या उर्जा बचत धोरणानुसार जाहीर ई निविदा मागवून स्मार्ट सिटी प्रकल्प सल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार ईस्क्रो मॉडेलनुसार पीपीपी तत्वावर स्मार्ट लायटिंग प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जानेवारीत निविदाही काढली गेली; मात्र यात पथदीपावरील जाहिरात फलकाद्वारे येणाऱ्या उत्पन्नाच्या अटीवरून अनेक ठेकेदारांनी नाके मुरडली. प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर निविदा रद्द करण्यात आली.
 
त्यानंतर नवीन अटीशर्थीनुसार काढलेल्या नवीन निविदेसही ठेकेदारांचा प्रतिसाद मिळालेला नाही. एकाच ठेकेदाराचा प्रतिसाद बघता किमान तिघांमध्ये स्पर्धा व्हावी या उद्देशातून फेरनिविदा काढावी लागली आहे. 

 

..तर ३० काेटी वाचणार 
स्मार्ट लायटिंगच्या माध्यमातून ५५ टक्के वीज बचत व त्यापाेटी दरवर्षी वीज वितरण कंपनीला दिल्या जाणाऱ्या ३० काेटींची बचत हाेईल अशी अपेक्षा आहे. बचत हाेणाऱ्या रकमेतून ठेकेदारास काही रक्कम दिली जाणार असून बचतीच्या रकमेतून पाच टक्के महापालिकेलाही मिळेल. पथदीपांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित मक्तेदाराचीच असणार असल्याने त्या खर्चाचीच बचत हाेणार आहे. ७६ हजार पथदीपांवरील सोडियम दिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्यासाठी मक्तेदाराला नऊ महिन्यांचा कालावधी दिला जाणार आहे. सात वर्षांची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराची असून पथदीप बंद पडल्यास ७२ तासांच्या आत दुरुस्ती केल्यास दंड साेसावा लागेल. 

 

असा हाेईल लखलखाट : 
स्मार्ट सिटीतून शहरातील गावठाण भागात ३५०० एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. शहरातील उर्वरित भागात ९२ हजार पथदीपांवर महापालिकेच्या माध्यमातून एलईडी दिवे बसविले जातील. सद्यस्थितीत ७५,४५५ सोडियम व टी- ५ अशा जुन्या फिटिंग्ज लावण्यात आलेल्या आहेत. नगरसेवकांनी काही ठिकाणी आपल्या निधीतून ११५२५ एलईडी फिटिंग्ज बसवल्या आहेत. याव्यतिरिक्त १२ हजार एलईडी दिवे बसवण्याला मान्यता मिळाली अाहे. त्या सर्व रद्द करण्यात येऊन एकत्रित ९२ हजार एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत.