Home | National | Delhi | Coal scam : 3 years imprisoned to Former coal secretary Gupta and 3

माजी कोळसा सचिव गुप्तासह 3 नोकरशहांना 3 वर्षांची कैद

वृत्तसंस्था | Update - Dec 06, 2018, 10:37 AM IST

कोळसा घोटाळा 40 प्रकरणांपैकी सहा खटल्यांत विशेष न्यायालयाने केला निवाडा

 • Coal scam : 3 years imprisoned to Former coal secretary Gupta and 3

  नवी दिल्ली - कोळसा खाणपट्टा वाटप घोटाळ्यात दिल्लीच्या एका न्यायालयाने माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्तासह तीन नोकरशहांना प्रत्येकी तीन वर्षांची कैदेची शिक्षा ठोठावली. शिक्षा मिळालेल्यांमध्ये गुप्ता यांच्याशिवाय के.एस. क्रोफा व के.सी. सामरिया यांचा समावेश आहे. तिघांनाही न्यायालयाने ५० हजारांचा दंडही ठोठावला. चार वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाल्याने तिघांनाही कोर्टातून जामीनही मिळाला. हे प्रकरण पश्चिम बंगालच्या मोरिया व मधुजोड येथील कोळसा खाण कंपनी विकास मेटल्स अँड पॉवर्स लिमिटेडशी (व्हीएमपीएल) संबंंधित असून त्यात मोठा गैरव्यवहार झाला आहे. विशेष न्यायालय भरत पराशर यांनी ३० नोव्हेंबर रोजी तीनही नोकरशहांसह पाच जणांना दोषी ठरवले होते. दोषी ठरल्यानंतर व्हीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक विकास पाटणी व त्याचे अधिकृत स्वाक्षरीकर्ता आनंद मलिक यांना प्रत्येकी चार वर्षांची शिक्षा झाली आहे. पाटणी यांच्यावर २५ लाख व मलिकला दोन लाखांचा दंड लावण्यात आला आहे.


  के.एस. क्रोफा
  खाण वाटपावेळी कोळसा मंत्रालयात संयुक्त सचिव होते. डिसेंबर २०१७ मध्ये मेघालयाचे मुख्य सचिव पदावर होते. कोळसा घोटाळ्यातील अन्य एका प्रकरणात दोन वर्षांची कैद झाली. मात्र, जामीन मंजूर झाला.दरम्यान, अशा प्रकरणांमुळे देशाचे आर्थिक नुकसान होते. त्याचबरोबर व्हाईट कॉलर गुन्हेगारीचा देशाला फटका बसतो, असे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवले.

  विशेष न्यायालयात कोळसा घोटाळ्याची ४० आरोपपत्रे, २०१४ मध्ये नियुक्ती
  संपुआ-१, संपुआ-२ च्या कार्यकाळातील कोळसा खाणपट्टा वाटपप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत ४० प्रकरणांत आरोपपत्र दाखल केले आहेत. २५ जुलै २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त सत्र न्यायाधीश भरत पराशर यांची कोळसा घोटाळ्यातील प्रकरणांत नियुक्त केले होते. आतापर्यंत विशेष न्यायालयाने सहा प्रकरणांत निर्णय दिला आहे.

  एच.सी. गुप्ता
  ३१ डिसेंबर, २००५ पासून नोव्हेंबर २००८ पर्यंत काेळसा सचिवपदी होते. विविध १२ प्रकरणांत तो आरोपी आहे. दोन प्रकरणांत दोषी ठरवले आहे. त्यात दोन व तीन वर्षांची शिक्षा ठोठावली गेली होती. या प्रकरणात तो जामिनावर आहे. बुधवारी तिसऱ्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली.

  सीबीआयने २०१२ मध्ये एफआयआर नोंदवला होता, कंपनीवर दंडाचीही मागणी
  व्हीएमपीएलवर एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. सीबीआयने सप्टेंबर २०१२ मध्ये या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला होता. तपास अधिकाऱ्यांनी सर्व पाच आरोपींना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी विनंती न्यायालयास केली होती. कंपनीवरही दंड लावण्याची मागणी केली होती.

  के.सी. सामरिया
  खाण वाटपादरम्यान कोळसा मंत्रालयात संचालक पदावर होते. सध्या अल्पसंख्याकविषयक मंत्रालयात संयुक्त सचिव पदावर आहेत. कोळसा घोटाळ्याच्या अन्य प्रकरणात सामरिया यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामध्येही त्यांना जामीन मिळाला आहे. सामरिया यांच्यासारखे अनेक अधिकारी खाण घोटाळ्यास सामील आहेत.

Trending