आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसा टंचाई, वीजदरात सहापट वाढ झाल्याने राज्यावर भारनियमनाचे संकट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- राज्यात रोज ४ हजार मेगावॅट वीज खरेदी करूनही २२ मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे. आधीच 'ऑक्टोबर हीट'मुळे हैराण झालेल्या राज्यात नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येपासून ९ तास भारनियमन होणार असल्याचे जाहीर झाले आहे. मात्र, या मागे काेळसा टंचाई, वीजदरात वाढ या दोन महत्त्वाच्या कारणांसोबतच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सणासुदीच्या काळात ही पाच राज्ये चढ्या दराने वीज खरेदी करीत आहेत. त्यामुळे नॅशनल पॉवर एक्स्चेेंज अर्थात सेंट्रल सेक्टरमध्ये २ रुपये ५५ पैसे युनिट दराने मिळणाऱ्या विजेचा दर आता १८ रुपये प्रति युनिट झाला अाहे. त्यामुळे राज्यात भारनियमनाचे संकट ओढवले अाहे. 


महानिर्मितीच्या सातही औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होण्यासाठी दररोज ३६ रेल्वे रॅक कोळसा लागतो. गेल्या पंधरवड्यापासून महानिर्मितीला केवळ सरासरी १८ ते २० रॅक कोळसा मिळत आहे. तब्बल ५० टक्के कोळशाची तूट असल्याने महानिर्मितीच्या वीजनिर्मितीचा पीएलएफ (प्लाँट लोड फॅक्टर) ६० टक्क्यांपर्यंत घसरला आहे. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला राज्याची वीज मागणी २० हजार ८१३ मेगावॅट होती. प्रत्यक्षात १४ हजार ४९७ मेगावॅट विजेची निर्मिती झाली. सेंट्रल सेक्टरमधून ४ हजार ११६ मेगावॅट वीज खरेदी केल्यानंतरही राज्याला २ हजार २०० मेगावॅट विजेची तूट कायम आहे. 


यामुळे महावितरणने जी- वन ते जी- थ्री या वितरण हानी अधिक असलेल्या ग्रुपवर वीज भारनियमन सुरू केले आहे. सेंट्रल सेक्टरमधून मिळणाऱ्या विजेचे दर सायंकाळी ६ वाजेनंतर वाढत असल्याने या काळात राज्याला विजेची खरेदी करता येत नाही. त्यामुळे याच कालावधीत सणासुदीत भारनियमन वाढीची भीती आहे. महावितरणला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या तसेच वीज हानी अत्यल्प असलेल्या ए ते डी या वितरण ग्रुपवरही हीच स्थिती राहिल्यास भारनियमन होण्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत. 


कोळशाचा साठा अल्प 
राज्यातील महानिर्मितीच्या चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, परळी, पारस, नाशिक व भुसावळ या सातही औष्णिक केंद्रांकडे केवळ ८ ते १० दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा शिल्लक आहे. महानिर्मितीने आवंटित केलेल्या डब्ल्यूसीएलकडून अल्प कोळसा मिळत आहे. तर साऊथ ईस्ट कोल्ड फील्ड, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाममधील महानदी खाणीतून मिळणाऱ्या कोळशावरही पावसाळ्यानंतर वाहतुकीसाठीही अडचणी येत असल्याने टंचाई वाढली आहे. 


भुसावळ केंद्राची स्थिती
भुसावळ औष्णिक वीजनिर्मिती केंद्राची स्थापित क्षमता १२१० मेगावॅट आहे. यातील ५०० बाय दोनचे संच कार्यान्वित असून त्यातून १ हजार मेगावॅटच्या तुलनेत केवळ ६०० मेगावॅट वीज मिळत आहे. तर २१० मेगावॅटचा संच एमओडीमुळे बंद ठेवण्यात आला आहे. चंद्रपूर, कोराडी वगळता सर्वच केंद्रांतून होणारी वीजनिर्मिती निम्म्यावर पोहोचली आहे. 


चढ्या दराने होत आहे खरेदी 
राज्यासह देशभरातील सर्वच राज्यांतील औष्णिक वीज केंद्रांना कोळसा टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे सेंट्रल सेक्टरमधून वीज खरेदीचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात सेंट्रल सेक्टरमधून मिळणाऱ्या विजेचे दर २ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट होते. ते सध्या मागणी वाढल्याने १८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मध्य प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असलेल्या राज्यांकडून अधिक प्रमाणात वीज खरेदी केली जात आहे. यामुळे राज्याला सेंट्रल सेक्टरमधूनही पुरेशा प्रमाणात वीज मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...