आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coalition In BJP And Shivsenea In Deoglur Constituency; BJP Got 25,000 Votes In Lok Sabha

देगलूर मतदारसंघात आघाडी युतीत अटीतटीची लढत; लोकसभेत भाजपला मिळाले 25 हजारांचे मताधिक्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड : देगलूर मतदारसंघात यावेळी शिवसेना व काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई होत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला २५ हजाराचे मताधिक्य देणारा हा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत कोणाच्या बाजूने कौल देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देगलूर मतदार संघात यावेळी एकूण ९ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर, शिवसेनेचे सुभाष साबणे, बसपाच्या सावित्रीबाई कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. रामचंद्र भरांडे, नॅशनल सोशालिस्ट पार्टीच्या विमल वाघमारे, बळवंत राजाराम गजभारे, बालाजी बळीराम बंडे, भीमराव नारायण गायकवाड व रामचंद्र करंजे हे अपक्ष उमेदवार म्हणून लढतीत आहेत. २०१४ च्या निवडणुकीत सुभाष साबणे यांना ६६ हजार ८५२ मते मिळाली तर रावसाहेब अंतापूरकर यांना ५८ हजार २०४ मते मिळाली. त्यावेळी सर्वच पक्ष स्वतंत्र लढले. भाजपचे भीमराव क्षीरसागर यांना २० हजार ५४२ मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मारोती वाडेकर यांना १२ हजार १२५ मते मिळाली. त्यावेळी आघाडी व युतीच्या मतात विभाजन झाले व त्याचा फायदा सुभाष साबणे यांना मिळाला. या वेळी मात्र युती आणि आघाडी आमने सामने आहेत. त्यामुळे खरी लढत सुभाष साबणे व रावसाहेब अंतापूरकर यांच्यात आहे. वंचित बहुजन आघाडीने रामचंद्र भरांडे यांना उमेदवारी दिली. परंतु वंचित बहुजन आघाडी व एमआयएममध्ये या निवडणुकीत फूट पडल्याने लोकसभा निवडणुकीप्रमाणे वंचितचा दबदबा या वेळी दिसत नाही. देगलूर मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार नाही.

मतदार संघात अनेक समस्या...
देगलूर तालुक्याला वरदान ठरणारा लेंडी प्रकल्प अद्याप पूर्ण झाला नाही. शंकरराव चव्हाणांच्या हस्ते याचे भूमिपूजन झाले. गेल्या पाच वर्षांत या प्रकल्पाचा दगडही हलला नाही. या प्रकल्पात जाणाऱ्या ११ गावांचा मावेजाचा प्रश्न अजूनही सुटला नाही. या प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या कुटुंबाचे जेथे पुनर्वसन केले तेथे कोणत्याही मुलभूत सुविधा नाहीत. स्मशानभूमीही नाही. देगलूर तालुका जिल्ह्यात अत्यल्प पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. करडखेड मध्यम प्रकल्पातून देगलूरला पाणी पुरवठा होतो. सध्या या प्रकल्पात २५ टक्के पाणी साठा आहे. संपूर्ण राज्यात पुराने थैमान घातले असताना देगलूरला सध्या चार दिवसांआड पाणी पुरवठा होतो. करंजवाडी व कुरडगी अशी दोन गावे मतदारसंघात आहेत. जेथे आजही जाण्या येण्यास रस्ता नाही. तेथे आजारी माणसाला आजही खाटेवर टाकून रुग्णालयात न्यावे लागते. बेरोजगारीची समस्याही गंभीर आहे.

आमदार असतानाही विकास नाही
सुभाष साबणे व रावसाहेब अंतापूरकर हे दोघेही माजी आमदार आहेत. त्यांच्याही काळात देगलूरचा फार विकास झाला नाही. वंचित बहुजन आघाडीने अपेक्षेपेक्षा जास्त मते घेतली तर त्याचा फटका अंतापूरकरांना बसेल. शिवा संघटनेचे बालाजी बंडे यांनी जास्त मते घेतली तर त्याचा फटका साबणे यांना बसेल. सद्यस्थितीत या मतदार लढत अटीतटीची दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...