Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Cold wave in the state: Mahabaleshwar mercury drops below zero

राज्यात थंडीची लाट : महाबळेश्वरला पारा शून्याखाली; गेल्या 77 वर्षांतील विक्रम मोडला

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Feb 10, 2019, 08:32 AM IST

औरंगाबादमध्ये ७ वर्षांनंतर फेब्रुवारीतील नीचांक 

 • Cold wave in the state: Mahabaleshwar mercury drops below zero

  औरंगाबाद/नाशिक/पुणे- उत्तरेकडील अतिथंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीची लाट आली. नाशिक जिल्ह्यात शिवडी, उगाव व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे पारा शून्यापर्यंत खाली आला. महाबळेश्वरमध्ये गेल्या ७७ वर्षांतील हे नीचांकी तापमान आहे. शनिवारी निफाड येथे ३, नाशिक ४, औरंगाबाद येथे ६.५ अंश तापमानाची नोंद झाली. सात वर्षांनंतर फेब्रुवारीतील हे नीचांकी तापमान आहे. तीन दिवसांपूर्वी उपसागरावरून बाष्पयुत्त वारे राज्याच्या दिशेने वाहिल्याने थंडी ओसरली होती. वाऱ्यांनी दिशा बदलल्याने थंडी तीव्र झाली आहे, असे मत हवामानशास्त्रतज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

  नाशिकमध्ये तीन बळी
  नाशिक शहर व जिल्ह्यात थंडीची लाट वाढत असून चांदवडमध्ये एक, तर शहरात दोन जणांचा थंडीने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. ९) सकाळी पंचवटीमधील एका मंदिर परिसरात उघडकीस आला. थंडीच्या मोसमातील मृत्यूच्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

  २०१२ नंतर फेब्रुवारीत नाशिकमध्येही नीचांक
  औरंगाबाद आणि नाशिक येथे सात वर्षांनंतर फेब्रुवारीतील नीचांकी तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद ६.५ अंश, तर नाशिकमध्ये ४ अंश तापमान नोंदवण्यात आले. सहा वर्षांपूर्वी ९ फेब्रुवारी २०१२ ला औरंगाबाद येथे ७.२, तर नाशिक येथे २.७ अंश तापमान नोंदवण्यात आले होते.

  राज्यात आठवडाभर राहणार थंडी
  राज्यावरील हवेचा दाब वाढला आहे. त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळे पारा घसरला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात येत्या आठवडाभर थंडीचा कडाका राहील. -डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

  गारपीट, पावसाचा इशारा : पुणे वेधशाळा
  पुणे वेधशाळेनुसार, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात १० ते १३ फेब्रुवारी या काळात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Trending