आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएस्सी शिकणाऱ्या अनयने बनवली पेट्रोलवर चालणारी फोरस्ट्रोक सायकल, जपानमधून मागवले इंजिन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सायकलमध्ये वायरलेस अँटी थीप टेक्निक, त्यामुळे चोरीचा धोका नाही.

एकनाथ पाठक

औरंगाबाद- शारीरिक तंदुरुस्ती, वेळ पडल्यावर मिळणारा वेग आणि वाढत्या खर्चाला आळा बसावा या तिहेरी उद्देशाने शहरातील एका महाविद्यालयीन युवकाने चक्क पेट्रोलवर चालणारी फोरस्ट्रोक सायकल तयार केली आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये तब्बल ९५ किमी अॅव्हरेज देणारी त्याची ही भन्नाट सायकल खरोखर सर्वांगाने अफलातून अशीच आहे. खटपटी स्वभावाच्या या युवकाने तयार केलेली ही सायकल कमीत कमी प्रदूषण करते.

शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयामध्ये अनय जोशी हा बीएस्सीचे शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच जगावेगळे काहीतरी करण्याची त्याची सवय. बारावीनंतर लांब असलेल्या कॉलेजात लवकर व कमी खर्चात जाता यावे म्हणून काहीतरी केलेच पाहिजे या विचारात तो होता. त्यातच त्याला ही कल्पना सुचली. कारण शेवटी गरज ही शोधाची जननी असते म्हणतात. तेच सूत्र या ठिकाणीही लागू पडले. प्रतिभाशक्ती जागृत झाली आणि हा आविष्कार झाला.

वडिलांसोबत पालथा घातला रविवार बाजार : 

ही सायकल तयार करण्यासाठी वेगवेगळ्या पार्टची गरज होती. शहरातील दुकाने, गॅरेज आणि रविवारच्या बाजारातून वेगवेगळे पार्ट त्याने खरेदी केेले. यासाठी त्याला वडील शशिकांत जोशी यांनी मोलाची साथ दिली. या दोघांनी रविवार बाजार पालथा घालून हे पार्ट मिळवले. पेट्रोलची टाकी फक्त त्यांना तयार करून घ्यावी लागली.

जपानमधून मागवले इंजिन : अनयने यासाठी लागणारे इंजिन त्याने जपानमधून मागवले. या इंजिनची घरीच सायकलला फिटिंग केली.

दोन वेगळ्या फीचर्सचा समावेश :


या सायकलमध्ये लक्झरी कारमध्ये वापरली जाणारी क्रूझ कंट्रोल प्रणाली आहे. त्यामुळे बाइक एका विशिष्ट स्पीडवर एकसारख्या गतीने धावू शकते. दुसरी बाब म्हणजे स्पोर्ट््स बाइकमध्ये वापरले जाणारे नायट्रस ऑक्साइड टेक्निकही यात आहे. यामुळे सायकल अधिक वेगाने धावण्यास मदत होते. जपानचे इंजिन, रविवार बाजारातील पार्ट‌्स आणि प्रतिभाशक्तीतून ३५ हजारांत नवा आविष्कार, एका लिटरमध्ये ९५ किमीचे अॅव्हरेज

सायकलची वैशिष्ट्ये
 
> फोरस्ट्रोक ५३ सीसी इंजिन असल्यामुळे कमी आवाज व इंधनाची मोठी बचत होते.
> इंजिन गिअरलेस असल्याने चालवण्यास साेपी.
> सायकलमध्ये क्रूझ कंट्रोल टेक्निक. त्यामुळे सायकलचा वेग एकसारखा राहतो.
> पेट्रोल संपले तर पॅडलने सायकल चालवण्याची सुविधा.
> सायकलचे वजन कमी असल्यामुळे इंधनाची बचत.
>सायकल कमी कार्बन उत्सर्जन करत असल्यामुळे प्रदूषण खूपच कमी होते.
> सायकलमध्ये वायरलेस अँटी थीप टेक्निक. त्यामुळे चोरीचा धोका नाही.

येण्या-जाण्याचा खर्च वाचला

मला महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सिटीमध्ये जावे लागते. यासाठी मला राेजचा प्रवासाचा खर्च झेपणारा नव्हता. त्यामुळे यावर काहीतरी मार्ग काढला जावा यासाठीच मी हा प्रयाेग साकारला. यातून मला ही वेगळ्या स्वरूपाची सायकल तयार करता अाली. अनय जाेशी, बीएस्सी विद्यार्थी, अाैरंगाबाद