आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंदेगावातील सामूहिक कॉपी प्रकरण : ३२१ विद्यार्थ्यांवर दोन परीक्षा बंदीची कारवाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद  - सामूहिक कॉपी प्रकरणात विभागीय शिक्षण मंडळाने गोंदेगाव येथील स.भु. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावरील ३२१ विद्यार्थ्यांवर वन प्लस टूची कारवाई केली. या कारवाईमुळे झालेल्या परीक्षेचे संपादित गुण रद्द करत पुढील जुलै आणि मार्च २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षेस विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे. तसेच दोषी शिक्षकांवर फौजदारी कारवाई करावी, असे आदेश माध्यमिक शिक्षण विभागास शनिवारी दिले.


सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील स. भु. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर मार्चमध्ये भरारी पथकाने भेट दिल्यानंतर दहावीच्या बीजगणित विषयाच्या पेपरला सामूहिक कॉपी सुरू असल्याचे आढळून अाले हाेते. शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत हाेते. काही शिक्षक तर पेपर लिहून देत होते. कॉप्यांच्या झेरॉक्स काढून त्या विद्यार्थ्यांना पुरवण्यात येत हाेत्या. यात ३२१ विद्यार्थी दोषी आढळून आले. बोर्डाकडून झालेल्या चौकशीचा अहवाल तदर्थ समितीसमोर ठेवण्यात आला होता. विभागीय शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांना वन प्लस टू म्हणजे दोन परीक्षांसाठी डिबार केले आहे. झालेल्या पेपरचे संपादित गुणही रद्द करण्यात आले आहेत. तसेच दोषी तीन शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शनिवारी बोर्डाच्या तदर्थ समितीमार्फत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल देण्यात आला. 
या अहवालानुसार केंद्र संचालक बी. एन. कोठावदे, गणित शिक्षक प्रदीप महालपुरे आणि संदीप महालपुरे यांनी संगनमताने बीजगणितच्या पेपरला गैरप्रकार केल्याचे नमूद करण्यात आले होते.  
 

 

१ ते ७ प्रश्न क्रमांकांची सोडवली होती उत्तरे 
चौकशीदरम्यान पेपरच्या दिवशी एक ते सात क्रमांकापर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे शिक्षकांनी सोडवण्यास मदत केली होती. अक्षराच्या साम्यावरून हे सिद्ध झाले होते.


दोषी शिक्षकांवर फौजदारी कारवाई 
या प्रकरणात मंडळातर्फे २८ मे रोजी तदर्थ समितीच्या ठराव क्रमांक २७ नुसार गैरप्रकारास जबाबदार असलेल्या तीन शिक्षकांवर महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ मालप्रॅक्‍टिस अॅक्‍ट युनिव्हर्सिटी अॅक्‍ट, बोर्ड अँड ऑदर स्पेसिफाइड एक्झामिनेशन अॅक्‍ट १९८२ मधील कलम सातनुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी, असे आदेश विभागीय शिक्षण मंडळाने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या १३ पर्यवेक्षकांवर कारवाई करावी, असे पत्र संबंधित संस्थेला दिले आहे.