आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकारांना दूषित पाणी पाजणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा शासनाकडून गौरव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- माेर्णा महोत्सवाच्या प्रसिद्धीवरुन शहरातील दैनिकांचे संपादक आणि पत्रकारांना आपल्या निवासस्थानी बोलावून दूषित पाण्याचे ग्लास आणि काडीकचऱ्याचा धूर करुन तो समोर फिरवणारे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची राज्य शासनाने २०१७-१८ या वर्षासाठी उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून मंगळवारी ८ जानेवारीला निवड जाहीर केली.

 

शहरात आल्यापासून आपल्या विशिष्ट कार्यशैलीमुळे जिल्हाधिकारी पांडेय वादग्रस्त ठरले आहेत. त्यात नुकत्याच झालेल्या मोर्णा महोत्सवाच्या कार्यक्रमांना कमी प्रसिद्धी दिल्याचे कारण देऊन त्यांनी संपादक व पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. आपली चूक लक्षात आल्यानंतर विविध वृत्तपत्रांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी संबधितांची माफीदेखील मागितली होती. त्यांच्या या कृत्याचा जिल्ह्यात सर्वस्तरातून निषेध करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी त्यांची खात्यांतर्गत चौकशी होईल की काय, अशी कुजबूज शासनस्तरावर सुरू असतानाच त्यांना मात्र उत्कृष्ट सेवेचे बक्षीस मिळाले आहे. राज्यातील सात उत्कृष्ट जिल्हाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र शासनाने जारी केले. त्यात अमरावती विभागातून अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे नाव आहे. याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल माध्यमातून पत्रकारांचे आभार मानून अकोलेकरांच्या कल्याणासाठी वचनबद्ध व समर्पित असल्याची भावना व्यक्त केली आहे. वर्षभरात नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची दरवर्षी या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. आज जारी झालेल्या यादीत ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, नंदूरबारचे मल्लिनाथ कलशेट्टी, सोलापूरचे राजेंद्र भोसले, सांगलीचे व्ही.एन. काळम-पाटील, उस्मानाबादचे रा.वी. गमे व वर्धेचे शैलेश नवाल यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. 

 

दरम्यान, जिल्हाधिकारी पांडेय सोमवारपासून १५ दिवसांच्या रजेवर जात आहेत. त्यांच्या रजाकाळात जिल्हा प्रशासनाचा प्रभार अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्याकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तसा पत्रव्यवहार झाला असून त्याला अद्याप मंत्रालयाकडून हिरवी झेंडी मिळायची आहे. कौटुंबिक कारणामुळे जिल्हाधिकारी १४ जानेवारीपासून रजेवर जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यापूर्वीचे दोन दिवस दुसरा शनिवार व रविवार असल्याने शासकीय सुटी असेल. जिल्हाधिकाऱ्यांचा रजाकाळ २ फेब्रुवारीपर्यंत असेल. त्यानंतरचा दुसरा दिवस रविवार आहे. अर्थात सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी ते पुन्हा आपल्या पदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांच्या रजाकाळातील प्रभार अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्याकडे सोपविण्याबाबत मंत्रालयाशी पत्रव्यवहार झाला आहे. कदाचित शुक्रवार, ११ जानेवारी रोजी याबाबतचा आदेश धडकेल, अशीही माहिती आहे. 

बातम्या आणखी आहेत...