Crime / पुण्यातील कर्नलसह 40 जवानांच्या विरोधात एफआयआर दाखल, शेतकऱ्याने केली होती तक्रार

सशस्त्र जवानांनी शेतात घुसून सोयाबीनचे नुकसान केल्याचा आरोप

दिव्य मराठी वेब

Jun 25,2019 06:04:18 PM IST

पुणे - येथे भारतीय लष्कराच्या कर्नलसह 40 जवानांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका शेतकऱ्याने या सर्वांच्या विरोधात आपली शेती उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. तक्रारीनुसार, लष्कराच्या जवानांनी मुद्दाम उभ्या सोयाबीनच्या शेतीवरून वाहने चालवली. हे सर्व काही कर्नल विजय गायकवाड यांच्या आदेशांवरून घडले, यातूनच सोयाबीनची शेती उद्ध्वस्त झाली असाही आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, लष्करी अधिकाऱ्यांनी आपल्यावरील आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.


कर्नल आणि शेतकऱ्यात जमीनीवरून वाद असल्याचा आरोप
सुत्रांच्या माहितीनुसार, कर्नल गायकवाडड आणि शेतकऱ्यात जमीनीवरून वाद सुरू आहे. 22 जून रोजी नाशिकपासून 54 किमी अंतरावर असलेल्या गुलानी गावात लष्कराच्या 4 गाड्या पोहोचल्या होत्या. याच वाहनांनी संबंधित शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान केले. शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार, कर्नल आणि जवानांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 143 (बेकायदा जमा होणे), 144 (अवैधरित्या शस्त्रांसह जमा होणे), 149 अर्थात एकाच हेतूने जमा झालेल्या लोकांनी गुन्हेगारी कृत्य करणे अशा स्वरुपाच्या कलमा लावण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यावेळी लष्करी जवान युनिफॉर्ममध्ये आणि सशस्त्र होते. त्यांच्यासोबत संबंधित कर्नल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुद्धा वादग्रस्त जमीनीवर गेले होते.


लष्करी अधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण
कर्नल गायकवाड यांनी सांगितले, की त्यांची टीम हैदराबाद येथून नाशिकला देवळाली कॅम्पला जात होती. पुण्यातील देहू रोड शस्त्रागारातून काही शस्त्रास्त्र घ्यायचे होते. परंतु, तत्पूर्वी आमच्या टीमने माझे मूळ गाव गुलानी येथे जाण्याचा निर्णय घेतला. यात जवानांचा काहीच दोष नाही. आम्ही कुणालाही धमकावलेले नाही. असा दावा त्यांनी केला आहे.

X
COMMENT