आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नल प्रॉथरचा अहवाल मिळाला, रायगडाच्या स्केचेसचा शोध सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सन १८१८ मध्ये ब्रिटिशांनी दुर्गराज रायगड ताब्यात घेतला तेव्हा रायगड मोहिमेची इत्थंभूत माहिती कर्नल प्रॉथरने मुंबईतील वरिष्ठांना अहवालरूपाने पाठवली. कर्नल प्रॉथर अहवालाचे लेखन करून थांबला नाही, तर त्याने १८१८ मध्ये पाहिलेल्या रायगडाचे अनेक स्केचेस केले आणि तेदेखील अहवालासोबत जोडले. इतिहासप्रेमींनी कर्नल प्रॉथर लिखित अहवाल शोधण्यात यश मिळवले. मात्र, त्याने केलेले स्केचेस या अहवालापासून वेगळे करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हे स्केचेस शोधण्यात यश मिळाले तर शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेल्या दुर्गराज रायगडाचे १८१८ मधील रुपडे प्रथमच जगासमोर येऊ शकेल. इतिहासतज्ञ, संशोधक आता कर्नल प्रॉथरच्या मूळ स्केचेसचा शोध घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.


आज शिवछत्रपतींचा ३४५ वा राज्याभिषेक स्मृती सोहळा रायगडावर होत असताना इतिहासप्रेमींच्या मनात १८१८ मधील रायगडाचे स्केचेस कसे मिळवता येतील हाच विचार आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे पदाधिकारी आणि रायगड प्राधिकरणाचे सदस्य सुधीर थोरात, प्राधिकरण सदस्य आणि इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे यांनीही कर्नल प्रॉथरच्या मूळ स्केचेसचा शोध सुरू केल्याचे सांगितले. 


‘शिवकालासंदर्भातील सुमारे ९२ रुमाल (कागदपत्रांचा जुडगा) आज उपलब्ध आहेत. एका रुमालात सुमारे पाच हजार कागदपत्रे असतात. या हिशेबाने ९२ रुमालात मिळून अंदाजे चार लाख ६० हजार कागदपत्रे आहेत. ही सर्व मोडी लिपीत आहेत. त्यामुळे ती वाचण्यासाठी मोडी लिपीतज्ञाची नितांत गरज आहे. हे काम एकट्याचे नाही. यासाठी मोडीलिपीतज्ञ, इतिहासतज्ञांचा समूह आवश्यक आहे. शिवाय हा गट केवळ याच कामासाठी समर्पित वृत्तीने काम करणारा हवा. त्यासाठी शासनाने निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. निधीची तरतूद, संशोधक समूहाला आवश्यक त्या सुविधा, कोषागारांच्या (अर्काईव्ज) परवानग्या, वेळेच्या मर्यादा यांच्या बंधनांशिवाय हा समूह काम करत राहिला तरच लक्षावधी कागदपत्रांतून मोलाचे ऐतिहासिक पुरावे मिळू शकतील, जे आपल्या इतिहासाला वळण देणारे ठरू शकतात,’ असे मत इतिहास संशोधकांनी यासंदर्भात मांडले आहे. 

 

स्वराज्याची राजधानी रायगडचा १८१८ मध्ये ब्रिटिशांनी ताबा घेतला
दुर्गराज रायगडावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक १६७४ मध्ये पार पडला. त्यानंतर १६८० मध्ये महाराजांचा मृत्यू झाला. १६८० ते १८१८ या १३८ वर्षांच्या कालखंडात रायगड मराठे, मोगल, सिद्दी, इंग्रज अशांच्या ताब्यात आलटून पालटून राहिला. अखेरीस १८१८ मध्ये ब्रिटिशांनी अधिकृतपणे रायगडाचा ताबा घेतला. हे काम कर्नल प्रॉथरने केले. त्यानेच रायगडावरील मोहिमेचा अहवाल लिहिला आणि स्केचेस काढले. प्रॉथरने आपला अहवाल स्केचेससह वरिष्ठांना पाठवला. पुढे अहवालापासून स्केचेस बाजूला काढून ते चीफ आर्किटेक्टकडे पाठवण्याचे आदेश प्राॅथरच्या वरिष्ठांनी दिल्याचे संदर्भ सापडल्याची माहिती पांडुरंग बलकवडे यांनी दिली. मात्र, पुढे ते स्केचेस कुठे गेले याचा शोध आता सुरू करण्यात आला आहे. हे स्केचेस सापडले, तर रायगडावरील १८१८ मध्ये शिल्लक असलेल्या मूळ इमारती, नव्याने उभारलेल्या वास्तू आणि संपूर्ण परिसराचे सम्यक चित्र आपल्यासमोर येऊ शकेल, असे बलकवडे यांनी दिव्य मराठीला सांगितले.

 

रायगड किल्ल्यासंदर्भातील कागदपत्रांचे प्रदर्शन व्हावे
शिवकाळाशी संबंधित कागदपत्रांतून फक्त रायगडाचा उल्लेख असलेली, गडावरील वास्तू, रचना, उभारणी, बांधणी, परिसर यासंदर्भातील ऐतिहासिक कागदपत्रांचे (मूळ कागदपत्रांच्या प्रतींचे) एक कायमस्वरूपी प्रदर्शन दुर्गराज रायगडावर असावे, अशी संकल्पना ‘रायगड प्राधिकरणा’समोर मांडण्यात आली आहे. अर्थात साडेचार लाख कागदपत्रांतून फक्त रायगडासंदर्भातील कागदपत्रे वेगळी करणे हे आव्हानात्मक काम आहे, असे इतिहासतज्ञ आणि प्राधिकरण सदस्य सुधीर थोरात यांनी सांगितले.